| खांदा कॉलनी | प्रतिनिधी |
नवीन पनवेल रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या अभ्युदय बँकेसमोरील पंचशील नगर झोपडपट्टीमार्गे दररोज हजारो प्रवासी ये-जा करत असतात. मात्र, पावसाळ्यात या मार्गाची अत्यंत दुरवस्था झाली असून चिखल, कचऱ्याची दुर्गंधी, खड्डे आणि वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांना मोठ्या हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत.
मुसळधार पावसामुळे पनवेल रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या पायवाटेवर मोठ्या प्रमाणात चिखल साचला आहे. परिसरात पडलेल्या कचऱ्याच्या ढिगांमधून येणाऱ्या दुर्गंधीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या महिला, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी आणि नोकरदार वर्गाला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. रेल्वे स्थानक परिसरात दुचाकी वाहनांची अनियंत्रित गर्दी रोखण्यासाठी प्रशासनाने लोखंडी रेलिंग उभारली आहे. मात्र, त्याचा परिणाम म्हणून अनेक दुचाकी वाहने नवीन पनवेलमधील अंतर्गत रस्त्यांवर पार्क केली जात असल्यामुळे वाहतूक कोंडी वाढत आहे. तसेच, पादचाऱ्यांना सुरक्षितपणे चालण्यासाठीही पुरेशी जागा उपलब्ध राहत नसल्याने त्यांची गैरसोय होत आहे. याशिवाय परिसरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून, त्यामध्ये पावसाचे पाणी साचत असल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. वारंवार तक्रारी करूनही लोकप्रतिनिधी आणि महापालिका प्रशासनाकडून या गंभीर समस्यांकडे दुर्लक्ष होत असल्याची तीव्र नाराजी नागरिकांनी व्यक्त केली आहे.
