अपूर्णावस्थेतील रस्त्यामुळे अपघातात वाढ

। सोगाव । वार्ताहर ।

अलिबाग तालुक्यातील प्रमुख महामार्गापैकी एक असलेल्या कनकेश्‍वर फाटा ते कार्लेखिंड मार्गावर कनकेश्‍वर फाटा, सोगाव, मूनवली येथे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने रस्ता काँक्रीटीकरणचे मागील सुमारे तीन महिन्यांपासून काम सुरू आहे.

या भागातील रस्ता वारंवार खराब होऊन रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडून नागरिकांसोबत वाहनचालकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत होते. यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने रस्ता काँक्रिटीकरण कामाला काही महिन्यांपूर्वी सुरुवात करण्यात आली होती, मात्र या काही दिवसांच्या असलेल्या रस्त्याच्या कामाला एवढे महिने होऊनही व पावसाळा तोंडावर येऊनही काम पूर्ण न झाल्याने ग्रामस्थांनी व वाहनचालकांनी नाराजी व्यक्त केली आहे. या मार्गाने जगातील दोन नंबरच्या असलेल्या आरसीएफ थळ कारखान्याकडे जाणार्‍या अवजड वाहनांची मोठ्या प्रमाणात ये-जा सुरू असते, तसेच याभागातील थळ, किहीम, आवास, सासवणे, मांडवा याठिकाणी पर्यटक मोठ्या प्रमाणात येत असतात, यासोबतच या भागात राजकीय, सामाजिक, सेलेब्रिटी, उद्योजक आदी मान्यवरांचे फार्महाऊस मोठ्या प्रमाणात आहेत.

ही सर्व मंडळी याच मार्गाने प्रवास करत असतात. या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर विकासाची कामे सुरू असल्याने खडी, माती, सिमेंट आदी अवजड वाहतूक करणारी वाहनेसुद्धा याच मार्गाने प्रवास करत असल्याने वारंवार अपघात होऊन वाहतूक कोंडीमुळे अडथळा निर्माण होत असल्याने सर्वसामान्य नागरिकांना, वाहनचालकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष देऊन या मार्गावरील रस्त्याच्या काँक्रीटीकरणचे काम युद्धपातळीवर पूर्ण करावे, अशी मागणी याभागातील ग्रामस्थ, पर्यटक व वाहनचालकांनी केली आहे. अलिबाग येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांना सदर रस्त्याच्या झालेल्या दुर्दशेबद्दल प्रतिक्रिया घेण्यासाठी संपर्क साधला असता त्यांनी फोन उचलून प्रतिसाद दिला नाही.

Exit mobile version