। मुंबई । वृत्तसंस्था ।
रस्त्यावर एखाद्या अज्ञात वाहनामुळे अपघात झाला आणि या वाहनाची माहिती मिळू शकली नाही, (हिट अॅण्ड रन) तर अशा घटनेतील अपघातग्रस्तांसाठी तातडीच्या नुकसानभरपाईची रक्कम आठपटीने वाढवण्यात येणार आहे. रस्ते वाहतूक मंत्रालयाकडून यात दोन लाख रुपये नुकसानभरपाई देण्याचे प्रस्तावित आहे.
देशभरातील अपघातांत हिट अॅण्ड रनच्या घटनांचाही मोठया प्रमाणात समावेश असतो. अपघात झाल्यानंतर वाहनचालक पळ काढतो. अशा वेळी अपघातग्रस्त किंवा त्याच्या कुटुंबीयांना उपचारासाठी तात्काळ मोठी मदत मिळावी या उद्देशाने नुकसानभरपाईत वाढ करण्यात आली. सध्या मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांना 25 हजार आणि गंभीर जखमी झाल्यास 12 हजार 500 रुपये मिळतात. यात आठपटीने वाढ करण्यात येणार आहे. मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांना दोन लाख आणि गंभीर जखमी झालेल्यांना 50 हजार रुपये नुकसानभरपाई दिली जाणार असल्याचे परिवहन विभागातील वरिष्ठ अधिकार्याने सांगितले.एखाद्या रस्ते अपघातात अपघात केलेल्या वाहनाचा आणि त्याचा मालकाचाही तपास लागू शकतो किंवा माहिती मिळते, अशा अपघातात मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांना तात्काळ पाच लाख रुपये आणि गंभीर जखमी झाल्यास अडीच लाख रुपये नुकसानभरपाई देण्यात येणार आहे.