। नेरळ । प्रतिनिधी ।
कर्जत तालुक्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे.तालुक्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत सलग तिसर्या वर्षी वाढ दिसून आली असून शुक्रवारी तर कर्जत तालुक्यातील एक डॉक्टरसह एका आश्रमशाळेची मुलगी आणि जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षिका देखील कोरोना पॉझिटिव्ह झाल्या आहेत. कर्जत तालुक्यातील सलग तिसर्या दिवशी रुग्ण संख्येत होत आहे.शुक्रवारी (दि.7)45 रुग्ण आढळून आले असून मागील दोन दिवस 25 हुन अधिक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले होते. मात्र त्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णात एकही ओमीक्रोनचा रुग्ण नाही. माथेरान मधील चार हॉटेल्समध्ये कामगार वर्गाला कोरोना झाला असून शहरात अन्य ठिकाणी तशी परिस्थिती अद्याप दिसून आलेली नाही. परंतु कर्जत तालुक्यात ग्रामीण भागात असलेले फार्म हाऊसमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळून आल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
तालुक्यातील भालीवडी येथील आश्रमशाळेची 16 वर्षीय विद्यार्थीनीला कोरोना झाल्याने शाळेच्या व्यवस्थापन पुढे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तालुक्यातील बोरिवली शाळेच्या शिक्षिका यांना कोरोना झाल्याने तेथे शाळा बंद ठेवावी लागली आहे. विजयभूमी या सोलनपाडा येथे असलेल्या विद्यापीठ मधील तिघांना कोरोना झाला आहे. तर तालुक्यातील कर्जत उपजिल्हा रुग्णालय मधील दोन आणि कडाव प्राथमिक आरोग्य केंद्रात एक अशा तीन कर्मचार्यांना कोरोना झाला आहे. दरम्यान, शुक्रवारी कर्जत शहरात तब्बल 22 रुग्ण आढळून आल्याने आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आहे.







