गावठी भाज्यांची आवक वाढल्याने भाज्यांचे भाव स्थिर
। तळा । प्रतिनिधी ।
श्रावण महिना सुरू असल्याने तळा बाजारपेठेत भाज्यांना मोठी मागणी वाढली आहे. श्रावण हा हिंदू धर्मातील पवित्र महिना असल्याने बहुतांश नागरिक श्रावणात उपवास करतात. जवळपास महिनाभर मटण, मच्छी वर्ज्य असल्याने नागरिक पालेभाज्या खाण्यावर अधिक भर देतात.
श्रावणापूर्वी गगनाला भिडलेले भाज्यांचे भाव श्रावण महिन्यात मात्र स्थिर आहेत. पाऊस दमदार झाल्याने तळा बाजारपेठेत गावठी भाज्यांची आवक देखील वाढली आहे. तालुक्यातील वावे, फळशेत, राणेचीवाडी, कर्नाळा, निगुडशेत या गावातील नागरिक मेथी, भेंडी, माठ, पालक, मुळा, मिरची अश्या असंख्य भाज्यांचा मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतात व घेतलेले भाज्यांचे पीक बाजारपेठेत विक्रीसाठी घेऊन येतात. श्रावणापूर्वी भाजीचा माल संपविण्यासाठी शेतकऱ्यांना दिवसभर बसावे लागत होते. परंतु, श्रावणात भाज्यांना मागणी वाढली असल्याने अवघ्या काही तासात येथील शेतकऱ्यांजवळील भाजी संपते. गावठी भाज्यांच्या उत्पादनामुळे खेड्यातील नागरिकांना रोजगार देखील उपलब्ध झाला आहे.
तळा बाजारपेठेतील भाज्यांचे दर
मटार=100 रु.प्रति किलो
कोबी=40 रु. प्रति किलो
टोमॅटो=40 रु. प्रति किलो
फ्लॉवर=50 रु. प्रति किलो
घेवडी=60 रु. प्रति किलो
भेंडी=60 रु. प्रति किलो
कारली=40 रु. प्रति किलो
पालक=20 रु. प्रति जुडी
मेथी=20 रु. प्रति जुडी
