ठाण्यात दिवाळीतील प्रदूषणात वाढ

गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत प्रदूषणात घट झाल्याचा पालिकेचा दावा

| ठाणे | प्रतिनिधी |

ठाणे महापालिका क्षेत्रात ठिकठिकाणी दिवाळीनिमित्ताने फटाक्यांची आतषबाजी करण्यात येत असल्यामुळे हवा गुणवत्ता निर्देशांक 190 वर पोहोचला आहे तर, आवाजाची पातळी 84 डेसिबल एवढी सर्वाधिक मोजण्यात आली आहे. यामुळे ठाण्यातील हवा आणि ध्वनी प्रदूषणात वाढ झाल्याची बाब पुढे आली आहे. दरम्यान, गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत हवा आणि ध्वनी प्रदूषण कमी झाल्याचा तसेच हरित फटाके फोडण्याचे प्रमाण वाढल्याने धुलीकणांचे प्रमाण घटल्याचा दावा पालिकेच्या प्रदूषण नियंत्रण विभागाने केला आहे.

ठाणे महापालिका क्षेत्रात दरवर्षी दिवाळी काळात हवा आणि ध्वनी प्रदूषणात वाढ होते. यंदाच्या दिवाळीतही हे चित्र कायम आहे. या काळात फटाके वाजण्याच्या प्रमाणातदेखील वाढ झाल्याचे निदर्शनास आले आहे. शहरात दिवाळीपूर्व काळात हवेचा गुणवत्ता निर्देशांक 127 इतका होता. दिवाळी काळात मात्र त्यामध्ये वाढ झाली असून, शहराचा हवा गुणवत्ता निर्देशांक 190 एवढा नोंदवण्यात आला आहे. या काळात, आवाजाची पातळी 84 डेसिबल एवढी सर्वाधिक मोजण्यात आली. दिवाळी पूर्व काळात ती 71 डेसिबल एवढी होती. मुख्य पर्यावरण अधिकारी मनिषा प्रधान, उप पर्यावरण अधिकारी विद्या सावंत आणि ज्युनियर केमिस्ट निर्मिती साळगावकर यांच्या पथकाने दिवाळी पूर्व आणि दिवाळी कालावधीत हवेची गुणवत्ता तपासण्याबरोबरच ध्वनीचे मापन केले. त्यामध्ये शहरात दिवाळी काळात हवा आणि ध्वनी प्रदूषणात वाढ झाल्याचे समोर आले.

ठाणे शहरात 2022 मध्ये दिवाळीपूर्व काळात हवेचा गुणवत्ता निर्देशांक 135 तर, दिवाळी काळात 197 इतका होता. 2023 मध्ये दिवाळी पुर्व काळात हवेचा गुणवत्ता निर्देशांक 115 तर, दिवाळी काळात 187 इतका होता. तर, 2024 मध्ये दिवाळी पूर्व काळात हवेचा गुणवत्ता निर्देशांक 127 तर, दिवाळी काळात 190 इतका नोंदविण्याच आला आहे. तसेच शहरात 2022 मध्ये दिवाळी पूर्व काळात ध्वनी पातळी 67 डेसीबल तर, दिवाळी काळात 89 डेसीबल इतकी होती. 2023 मध्ये दिवाळी पूर्व काळात ध्वनी पातळी 68 डेसीबल तर, दिवाळी काळात 70 डेसीबल इतकी होती. तर, 2024 मध्ये दिवाळी पूर्व काळात ध्वनी पातळी 71 डेसीबल तर, दिवाळी काळात 84 डेसीबल इतकी आहे.

Exit mobile version