छत्रपती शिवाजी महाराज चषक स्पर्धेच्या अनुदानात वाढ

। मुंबई । प्रतिनिधी ।
छत्रपती शिवाजी महाराज चषक स्पर्धेच्या अनुदानात भरघोस वाढ करण्यात आली आहे. त्याबद्दल महाराष्ट्र राज्य कबड्डी असो. चे कार्यकारणी सदस्य व क्रीडाप्रेमी बाबुराव चांदेरे यांच्यावतीने अजित पवार याचे आभार व्यक्त करण्यात आले. शिवशाही चषक या नावाने या स्पर्धेला सुरुवात झाली. आज ती छत्रपती शिवाजी महाराज या नावाने प्रचलित आहे. महाराष्ट्र शासनाच्यावतीने प्रतिवर्षी वेगवेगळ्या जिल्ह्यात या स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. पंचवीस लाख रुपये अनुदान मिळणार्‍या या स्पर्धेस पवार अर्थमंत्री झाल्यावर पन्नास लाख रुपये अनुदान मंजूर करून घेतले. आज त्यात भरघोस वाढ करून ते एक करोड रुपये करण्यात आली. त्यामुळे क्रीडा जगतात आनंदाचे वातारण तयार झाले आहे. गेली दोन वर्ष कोरोनामुळे मरगळ आलेल्या खेळाच्या जगतात या घोषणेमुळे उत्साहाचे वातावरण तयार झाले आहे.


या निमिताने क्रीडाप्रेमी बाबुराव चांदेरे यांनी शासनाच्यावतीने थेट नियुक्त करण्यात येणार्‍या खेळाडू कोठ्यातील फाईल प्रलंबित आहेत. अशा 54 खेळाडूंची यादी पवरांना सादर केली व त्यावर लवकरात लवकर कार्यवाही व्हावी अशी विनंती केली. त्यात सायली केरीपाळे, गिरीश इरणाक, रिशांक देवाडीगा, अभिलाषा म्हात्रे, सोनाली शिंगटे या कबड्डीच्या खेळाडू सोबत, उत्कर्ष काळे, मनीषा दिवेकर, सोनाली तोडणकर, कोमल गोळे हे कुस्तीचे व 11 खो-खो च्या खेळाडूंचा देखील सहभाग आहे. कबड्डी वर्तुळात कबड्डीमहर्षी बुवा साळवी यांच्या निधनानंतर एक पोकळी निर्माण झाली होती, पण पवार घेत असलेल्या खेळाडूंच्या हिताच्या निर्णयामुळे बुवांची ही पोकळी लवकर भरून निघेल असे कबड्डीप्रेमींना वाटू लागले आहे.

Exit mobile version