जयदीप आपटेच्या पोलीस कोठडीत वाढ

| सावंतवाडी | प्रतिनिधी |

मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या पुतळ्याचा शिल्पकार जयदीप आपटे व बांधकाम रचना सल्लागार डॉ. चेतन पाटील यांची पाच दिवसांची पोलीस कोठडी संपल्याने मंगळवारी (दि. 10) दुपारी पुन्हा मालवण न्यायालयात हजर करण्यात आले. यामध्ये जयदीप आपटे याला दि. 13 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी, तर पाटील याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. पाटील याची सावंतवाडी कारागृहात रवानगी करण्यात येणार आहे.

राजकोट किल्ला येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याची घटना 26 ऑगस्ट रोजी घडली होती. याप्रकरणी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांनी दिलेल्या तक्रारीनुसार पुतळ्याचा ठेकेदार जयदीप आपटे, तांत्रिक सल्लागार चेतन पाटील या दोघांविरुद्ध विविध कलमान्वये येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर प्रथम डॉ. पाटील याला अटक करून पाच दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली होती. त्यानंतर आपटे याला अटक केल्यावर या दोघांनाही 10 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. आज कोठडीची मुदत संपल्याने या दोघांनाही कडेकोट पोलीस बंदोबस्तात पुन्हा मालवण न्यायालयात हजर करण्यात आले.

मुख्य संशयित आरोपी जयदीप आपटे याची अजून चौकशी करायची असल्याने सात दिवसांची पोलीस कोठडी देण्यात यावी, अशी मागणी सरकारी पक्षाच्यावतीने न्यायालयात करण्यात आली. त्यानुसार न्यायाधीश एम.आर. देवकाते यांनी आपटे याला 13 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी तर चेतन पाटील याला न्यायालयीन कोठडी सुनावली.

Exit mobile version