| मुंबई | प्रतिनिधी |
छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर फरार झालेला जयदीप आपटे अखेर सापडला आहे. कल्याण आणि सिंधुदुर्ग पोलिसांनी शिल्पकार जयदीप आपटेला बुधवारी (दि.4) रोजी अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जयदीप आपटे कुटुंबीयांना भेटायला आला असताना अटक करण्यात आली. बुधवारी रात्री साडेनऊ ते दहाच्या सुमारास तोंडाला रुमाल बांधून आपल्या इमारतीमध्ये शिरण्याचा प्रयत्न केला. यावेळी इमारतीच्या बाहेर उभे असलेल्या बाजारपेठ पोलीस स्थानकाचे एपीआय श्रीकांत चव्हाण पोलीस हवालदार तडवी , बागुल , पाटील आणि कॉन्स्टेबल मंगेश शेळके यांना त्याच्यावर संशय आला. पोलिसाच्या पथकाने जयदीपला तोंडावरचा रुमाल काढण्यास सांगितले त्यावेळेला पोलिसांना कळाले की हा जयदीप आहे. त्यानंतर पोलिसांनी त्याला मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले. त्याला कल्याण झोन 3 चे डीसीपी सचिन गुंजाळ यांच्या कार्यालयात नेण्यात आले, तिथे त्याची चौकशी करण्यात आली आहे. त्यानंतर तिथे सिंधुदुर्ग शाखेचे पथक देखील दाखल झाले, पोलिसांच्या पथकाने मोठ्या पोलीस बंदोबस्तात जयदीप आपटे याला सिंधुदुर्गमध्ये आणले, दरम्यान आजच त्याला कोर्टात हजर केले जाण्याची शक्यता आहे.