| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
दिल्ली न्यायालयाने गुरुवारी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कथित मद्य धोरण घोटाळा प्रकरणाशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात 1 एप्रिलपर्यंत अंमलबजावणी संचालनालय (ईडी) कोठडी सुनावली. त्यांना 21 मार्चच्या रात्री अटक करण्यात आली होती.
सहा दिवसांच्या ईडी कोठडीची मुदत संपल्यानंतर केजरीवाल यांना न्यायालयात हजर करण्यात आल्यानंतर राऊस अव्हेन्यू न्यायालयाच्या विशेष सीबीआय न्यायाधीश कावेरी बावेजा यांनी हा आदेश दिला. बुधवारी दिल्ली उच्च न्यायालयाने केजरीवाल यांना कोणताही अंतरिम दिलासा नाकारला होता आणि अटक आणि रिमांडला आव्हान देणाऱ्या त्यांच्या याचिकेवर नोटीस बजावली होती. दरम्यान, गुरुवारी न्यायालयात हजर केल्यानंतर ईडीने केजरीवाल यांच्या आणखी सात दिवसांची कोठडी मागितली होती. या सुनावणीदरम्यान केजरीवाल यांनी स्वतः आपली बाजू मांडली. असे करणारे ते देशातील पहिले विद्यमान मुख्यमंत्री ठरले आहेत.