माथेरान रेल्वे शटलच्या फेरीत वाढ

। माथेरान । वार्ताहर ।
ऐन सुट्ट्यांच्या हंगामामध्ये माथेराान रेल्वेच्या शटल सेवेच्या फेरीमध्ये वाढ करण्यात आल्याने स्थानिकांसह पर्यटकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. माथेरान मधून दस्तुरी मोटार पार्किंग पर्यंत जाण्यासाठी माथेरान स्टेशन पासून जवळपास तीन किलोमीटर पायपीट करावी लागत असल्याने अनेकदा रेल्वेच्या शटल सेवेचा प्रवास करण्यासाठी प्रवाशांना गर्दीच्या वेळी तिकीट उपलब्ध होत नाहीत. याकामी नुकताच रेल्वेचे व्यवस्थापक शलभ गोयल यांनी माथेरान स्टेशनला धावती भेट दिली होती. त्यावेळेस नगराध्यक्षा प्रेरणा सावंत आणि माजी नगराध्यक्ष अजय सावंत यांनी अन्य ग्रामस्थांसह या मार्गावर शटल सेवेच्या फेर्‍यात वाढ करावी अशी माथेरानकरांच्या वतीने विनंती केली होती त्या विनंतीची शलभ गोयल यांनी नोंद घेऊन या फेर्‍यात वाढ करण्याचा निर्णय घेतल्याचे येथील रेल्वेच्या सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.
दस्तुरी नाक्याजवळ असलेल्या अमन लॉज रेल्वे स्टेशन पासून माथेरान स्टेशन पर्यंत येण्यासाठी शटल सेवा हाच एकमेव स्वस्त आणि सुरक्षित उत्तम पर्याय आहे. येणार्‍या पर्यटकांना अन्य वाहतुकीचा अवाजवी खर्च न परवडणारा असल्याने बहुतांश पर्यटक हे याच शटल सेवेचा आधार घेतात. मागील काळात या मार्गावर शटलच्या आठ फेर्‍या उपलब्ध होत्या तर शनिवार आणि रविवारच्या दिवशी अन्य दोन फेर्‍या रेल्वेच्या माध्यमातून व्हायच्या. परंतु आता सोमवार ते रविवार या सर्व दिवशी अप डाऊन अशा दहा फेर्‍या करण्यात आल्या आहेत.

Exit mobile version