| अलिबाग | प्रतिनिधी |
गावातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी मदत करणारे पोलीस पाटील तुटपुंज्या मानधनात काम करीत होते. मानधनवाढीसाठी केलेल्या लढ्यानंतर सरकारने त्यांच्या मानधनात वाढ केली आहे. त्यामुळे आता पोलीस पाटलांना 15 हजार रुपये मानधन दिले जाणार आहे.
रायगड जिल्हा पोलीस दलाच्या अखत्यारित 16 लाखांहून अधिक लोकसंख्या असून, 28 पोलीस ठाणे आहेत. या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत येणाऱ्या गावांतील बेकायदेशीर धंदे, गैरप्रकारावर नजर ठेवण्याचे काम पोलीस पाटील करतात. आपत्कालीन परिस्थितीत पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारे जिल्ह्यातील 900 हून अधिक पोलीस पाटील रात्रीचा दिवस करून सेवा देतात. रिक्त पदांअभावी दोन ते तीन गावांच्या सुरक्षेची जबाबदारी एकाच पोलीस पाटलावर राहिली आहे. त्यात त्यांना सहा हजार 500 रुपये इतक्यामानधनावर काम करावे लागत होते. तुटपुंज्या मानधनामुळे त्यांना घरखर्चदेखील चालवणे कठीण झाले होते.
पोलीस पाटील यांचे मानधन वाढविण्यात यावे यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून आंदोलन सुरू होते. त्यासाठी मोर्चेदेखील काढले होते. परंतु, त्याची अंमलबजावणी झाली नाही. त्यामुळे सरकारबद्दल नाराजी निर्माण झाली होते. दरम्यान, सरकारने पोलीस पाटील यांच्या मानधनात वाढ केल्याची माहिती समोर येत आहे. मंत्रिमंडळात हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
पोलीस पाटील तुटपुंज्या मानधनामध्ये काम करीत होते. सरकारकडे पाठपुरावा केल्यानंतर अखेर 15 हजार रुपये मानधन आता दिले जाणार आहे. सरकारने घेतलेला निर्णय समाधानकारक आहे. मात्र, रिक्त पदेदेखील तातडीने भरण्यात यावीत.
विकास पाटील, सरचिटणीस रायगड जिल्हा
महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील संघ