नव्या कोरोनाबाधितांसह मृत्यूतही घट
नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
देशात आता कोरोनाची दुसरी लाट ओसरताना दिसत आहे. दिवसेंदिवस नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत, तसेच कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या संख्येत मोठी घट होत असून, कोरोनामुक्त होणार्यांच्या संख्येत आता वाढ होत आहे. काल प्रथमच दैनंदिन कोरोनाबाधितांची संख्या एक लाखाच्याही खाली आली आहे.
गेल्या 24 तासांत देशामध्ये 86 हजार 498 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली. एका दिवसात एक लाखाहूनही कमी बाधित आढळण्याची ही पहिलीच वेळ आहे. तर देशातल्या कोरोनामुक्त होणार्यांची संख्या आजही बाधितांच्या संख्येपेक्षा जास्तच आहे. देशात सोमवारी दिवसभरात एक लाख 82 हजार 282 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. देशात सध्या उपचाराधीन असलेल्या रुग्णांची संख्या 13 लाख 3 हजार 702 झाली आहे.
कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंची संख्याही दिवसेंदिवस कमी होताना दिसत आहे. सोमवारी दिवसभरातल्या देशातल्या मृत्यूंची संख्या 2,123 इतकी आहे. त्यामुळे देशातल्या कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंची एकूण संख्या आता तीन लाख 51 हजार 309 वर पोहोचली आहे.
देशात करोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमही वेगात सुरु आहे. गेल्या 24 तासात देशातल्या 33 लाख 64 हजार 476 नागरिकांनी लस घेतली. त्यापैकी 30 लाख 38 हजार 289 नागरिकांनी करोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतला तर दुसरा डोस घेणार्यांची संख्या तीन लाख 26 हजार 187 इतकी आहे.