पालेभाज्यांसह फळांच्या दरात वाढ

। पनवेल । वार्ताहर ।
उन्हाच्या काहीलीमध्ये पनवेल परिसरातील बाजारपेठेत पालेभाज्यांसह फळांचे दर गगनाला भिडत चालले आहे. सध्या उन्हाचा पारा चढत चालल्याने पनवेल परिसरातील भाजीपाला बाजारात भाज्यांची आवक घटली असून, पनवेल परिसरातील बाजारात दाखल होत असलेला बहुतांश भाजीपाला उन्हामुळे खराब होत आहे. त्यामुळे भाजीपाला बाजारात मागणी जास्त आणि पुरवठा कमी होत असल्याने दरवाढ होत आहे.

भाजीपाला बाजारात 20-25 टक्के दरवाढ झाली आहे. बाजारात टोमॅटो, भेंडी, कारली, फरसबी, पापडी, वांगी आणि पालेभाज्या यांच्या दरात वाढ झाली आहे. उन्हाळ्यात भाज्यांचे उत्पादन कमी होते. सध्या उन्हाचा पारा वाढला असून, कडक उन्हाने भाजीपाला बाजारात दाखल होणारा भाजीपाला खराब होत आहे. त्यामुळे बाजारात भाजीपाला दरवाढ होत आहे. हीच अवस्था फळांची झाली असून त्यांचेही दर चढते आहे. सध्या बाजारात भेंडी 24 ते 25 रुपयांवरुन आता 30 रुपये तर पापडी 70 ते 75 रुपयांवरुन 90 रुपये, टोमॅटो 14 ते 15 रुपयांवरुन 18 ते 20 रुपये, फरसबी 70 ते 75 रुपयांवरुन 80 ते 90, कारली 20 ते 22 रुपयांवरुन 32 रुपये, वांगी 26 ते 28 रुपयांवरुन आता 34 ते 35 रुपये इतक्या दरात उपलब्ध आहेत. तसेच बाजारपेठेत केळी, आंबे, कलिंगड आणि शहाळी, टरबूज आदींचे दर सुद्धा चढत चालले आहेत.

Exit mobile version