वनसंपदेचे मोठे नुकसान
| सुकेळी | वार्ताहर |
रायगड जिल्ह्यामध्ये फेब्रुवारी महिना सुरू झाल्यापासून अनेक डोंगरांमध्ये वणव्यांचे प्रमाण हे दिवसेंदिवस फार मोठ्या प्रमाणात वाढत चालले आहे. नागोठणे परिसरातील सुकेळी, भिसे खिंड, खांब, वाकण आदी डोंगरांमध्ये वणव्यांचे प्रमाण वाढले असुन याबाबतीत वनखात्याचे अक्षम्य दुर्लक्ष व निष्काळजीपणा होत असल्याचे निदर्शनास येत आहे. यावर्षी फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीपासूनच मोठ्या प्रमाणात उष्णता वाढल्याचे जाणवत आहे. यातच रायगड जिल्ह्यातील अनेक डोंगरांमध्ये वणवे लावल्यामुळे मोठ्या प्रमाणात पालापाचोळा व सुकलेल्या झाडांच्या पानांचा खच पडलेला असल्यामुळे आग सर्वत्र पसरल्यामुळे या वणव्यात नैसर्गिक वनसंपदेचे मोठे नुकसान होत आहे.
वणव्यांचे प्रमाण वाढण्याचे नक्की कारण काय? वणव्यांच्या वाढत्या संख्येला आळा बसेल का? अशा प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटत आहेत. याबाबतीत वनखात्याच्या वरिष्ठ अधिकारी वर्गाने गांभीर्याने लक्ष घालून वणव्यांचे प्रमाण रोखण्यासाठी योग्य त्या उपाययोजना कराव्यात अशी मागणी होत आहे.