। मुंबई । वृत्तसंस्था ।
राज्य सरकारने महापालिका, नगरपालिकांच्या भार्तीवर जिल्हा परिषदा, पंचायत समित्यांची सदस्यसंख्या लोकसंख्येच्या प्रमाणात वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार रायगड जिल्हा परिषदेची सदस्यसंख्या आता सात जागांनी वाढणार आहे. त्यातील एक जागा पेण तालुक्यातील आहे. आता तो नवीन मतदारसंघ कोणता असेल, याबाबत कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे.
राज्य सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीत जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये साधारणपणे सहा ते सात टक्के जागा वाढविण्यास मंजुरी दिली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी हा मोठा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे. या निर्णयामुळे निवडणुकीच्या रिंगणात उतरू पाहणार्या इच्छुकांना अधिक जागा उपलध होणार आहे.
पेण तालुक्यामध्ये जिल्हा परिषदेच्या पाच जागा असून नवीन नियमांनुसार आता सहा जागा होणार आहेत; तर पंचायत समितीच्या 10 जागांवरून 12 जागा होणार आहे. अशा प्रकारे जिल्हा परिषदेची एक व पंचायत समितीच्या 2 जागा वाढल्याने इच्छुक उमेदवारांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. पेण तालुक्यात पाचही ठिकाणी शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा परिषद सदस्य आहेत; तर पंचायत समितीच्या 10 पैकी 7 जागांवर शेकाप, एका जागेवर काँग्रेस, दोन जागांवर शिवसेना असे संख्याबळ आहे.
नव्या नियमानुसार वाढलेल्या जागांचा फायदा हा शेतकरी कामगार पक्षालाच होईल, असे जाणकारांचे मत आहे; मात्र आगामी काळात होणार्या युत्या, आघाडींच्या गणितानुसार पेण तालुक्यात समीकरणे बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही. सध्या तरी पेण तालुक्यात तिरंगी लढत होईल, अशी शक्यता आहे.