खारघरमधील दारूबंदीच्या सीमा वाढवा; प्रितम म्हात्रेंची मागणी

| पनवेल | प्रतिनिधी |

पूर्वीच्या खारघर ग्रामपंचायतीच्या हद्दीच्या बाहेरही खारघर शहर झपाट्याने वाढले आहे. या गोष्टीचा विचार करून खारघरकरांची मते जाणून दारूबंदीच्या सीमा वाढवण्यात याव्यात. तसेच पूर्वाश्रमीच्या खारघर ग्रामपंचायतीमधील क्षेत्रामधील किरकोळ व घाऊक मद्यविक्री बंदीच्या धोरणाबाबत सोमवारी (दि.28) झालेल्या प्रशासकीय महासभेमध्ये पनवेल महानगरपालिका प्रशासनाने दारूबंदीसाठी ठराव घेऊन ज्या सीमा कायम केलेल्या आहेत, त्या ठरावाची मागणी माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांनी केली आहे.

‘नो लीकर झोन’ म्हणून ओळख असणार्‍या खारघर शहरात निरसुख पॅलेस नामक एका नव्या बार अँड रेस्टॉरंटला उत्पादन शुल्क विभागाने दारूविक्रीची परवानगी दिली आहे. या निरसूख पॅलेस बारला विरोध कायम असून, राजकीय पक्षांसह विविध स्तरातून विरोध केला जात आहे. 27 जुलै 2017 रोजी झालेल्या पनवेल महापालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये पनवेल महानगरपालिका हद्दीमधील पूर्वीच्या खारघर ग्रामपंचायत क्षेत्रामध्ये दारूबंदी कायम करण्यात आली होती. परंतु, ग्रामपंचायतीचे रूपांतर महापालिकेत झाल्यानंतर सदर ठिकाणी दारूविक्री परवाना देण्यास सुरूवात झाली आहे. त्यामुळे खारघर परिसरातील जनतेचे मत लक्षात घेऊन जनहिताचा कौल मान्य करत खारघर ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आलेली दारूबंदी पनवेल महानगरपालिकेनेदेखील कायम ठेवावी, या धर्तीवर प्रीतम म्हात्रे यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. त्यानुसार 18 डिसेंबर 2017 रोजीच्या आयत्या वेळेस विषय क्रमांक 1 मध्ये हा विषय चर्चेत आला आणि प्रशासनाने त्यावेळी दारूबंदीसंदर्भात ठराव केला. त्यासंदर्भात पुढील कार्यवाही न झाल्यामुळे खारघर परिसरात निरसुख पॅलेस बार यांना राज्य उत्पादन शुल्काकडून दारू विक्री परवाना देण्यात आला.

दि.18 डिसेंबर 2017 रोजी बोलविण्यात आलेल्या महासभेत पनवेल महानगरपालिका हद्दीमधील पूर्वीच्या खारघर ग्रामपंचायत क्षेत्रांमध्ये दारूबंदी कायम करण्यात आली होती. परंतु ग्रामपंचायतीचे रूपांतर महानगरपालिकेत झाल्यानंतर सदर ठिकाणी दारूविक्री परवाना देण्यास सुरुवात झाली आहे. तरी खारघर परिसर हा पूर्वीप्रमाणेच ‘नो लिकर झोन’ करण्याचा ठराव सर्वसाधारण सभेमध्ये पारित करण्यात यावा, अशी मागणी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांनी केली होती आणि तत्कालीन सभागृहनेते परेश ठाकूर यांनी पनवेल महापालिका अंतर्गत येणार्‍या शाळा व महाविद्यालयाच्या 100 मीटर भोवतालच्या शाळांमध्ये हॉटेलचा सर्व्हे करून तेथील दारूविक्री परवानेदेखील रद्द करण्यात यावे अशी लक्षवेधी मांडली.

या मागणीबाबत पनवेल महापालिकेने सकारात्मक निर्णय घेऊन पूर्वाश्रमीच्या खारघर ग्रामपंचायतीमधील क्षेत्रामधील किरकोळ व घाऊक मद्यविक्री बंदीच्या धोरणाबाबत प्रशासकीय महासभेमध्ये मंजुरी देण्यात आली असून, प्रीतम म्हात्रे यांच्या मागणीला व पाठपुराव्याला यश आले आहे.

उशिरा का होईना परंतु पनवेल महानगरपालिका प्रशासनाकडून योग्य तो निर्णय घेण्यात आला याबद्दल मी समाधानी आहे. परंतु राज्य सरकार आणि राज्य उत्पादन शुल्क यांच्याकडे जोपर्यंत अधिकृत ‘खारघर नो लीकर झोन’ म्हणून नोंद होत नाही, तोपर्यंत पाठपुरावा सुरूच ठेवणार.

प्रीतम म्हात्रे
Exit mobile version