पोलची उंची तात्काळ वाढवा

वाहनचालकांची सिडकोकडे मागणी
| उरण | वार्ताहर |
उरण बोकडविरा सिडको कार्यालयासमोरील साकव कमकुवत झाल्यामुळे सिडकोच्या वतीने अवजड वाहनांना बंदी करून रस्त्याच्या दोन्ही बाजूला लोखंडी पोल उभे केले आहेत. परंतु, त्यांची उंची कमी असल्याने छोटी रिक्षासारखी वाहनेही येत नसल्यामुळे अपघात होत आहेत. तरी त्याची उंची वाढवा अन्यथा पर्यायी साकव उभारणीचे काम सिडकोने त्वरित सुरू करण्याची मागणी वाहनचालकांकडून जोर धरू लागली आहे.

उरण-पनवेलला जाणार्‍या रस्त्यावरील बोकडविरा गावाजवळ असलेला साकव कमकुवत झाला आहे. तर फुंडे गावाजवळ असलेला पूल कोसळून एकाचा बळी गेला आहे. यामुळे बोकडविरा येथील कमकुवत साकववरून अवजड वाहनांना सिडकोने बंदी घातली होती. तरीही अवजड वाहने येजा करीत होते. त्यासाठी लोखंडी पोल उभारण्यात आले आहेत. परंतु, या पोलची उंची कमी असल्यामुळे तेथून रिक्षा टेंम्पोसारखी छोटी वाहनेही येत असताना अनेकवेळा अपघात झाला आहे. आतापर्यंत 6-7 अपघात झाल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे हातावर पोट असणार्‍या छोट्या वाहनचालकांना नाहक भुर्दंड सहन करावा लागत आहे. आता दोन दिवसांवर गणेशोत्सव सण आला. यावेळी एखादी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी सिडकोने याचा सारासार विचार करून पोलची उंची त्वरित वाढवावी व नवीन साकव उभारण्याचे काम सुरू करावे, अशी मागणी वाहनचालकांकडून जोर धरू लागली आहे.

Exit mobile version