। उरण । वार्ताहर ।
कोरोना काळात उरण आगारातील कमी झालेल्या गाड्यांची संख्या अद्यापही न वाढवल्यामुळे या मार्गावर फेर्याची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे प्रवाशांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. परिणामी, एसटी गाड्यांची संख्या वाढविण्यासाठी शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने शहर चिटणीस शेखर पाटील यांनी शिष्टमंडळासमवेत आगार व्यवस्थापक सतीश मालचे यांना निवेदन दिले आहे.
यावेळी शहर चिटणीस शेखर पाटील, तालुका सहचिटणीस यशवंत ठाकूर, तालुका महिला आघाडी अध्यक्षा सीमा घरत, शहर अध्यक्षा नयना पाटील, शहर उपाध्यक्षा रंजना पाटील, पदाधिकारी शंकर भोईर, दिलीप पाटील उपस्थित होते. उरण तालुक्यातील गावांना जोडणार्या बस, पनवेल व दादर याठिकाणच्या पहाटे साडेचार वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंतच्या फेर्या बंद आहेत. तसेच लांब पल्याच्या ठराविक गाड्या वगळता बसेस बंद आहेत. याचा फटका विद्यार्थी, कामगार वर्ग व प्रवासी वर्ग यांना बसतो.
सर्वसामान्य माणसाला परवडेल अशी बससेवा नियमित नसल्याने प्रवाशांवर आर्थिक भार वाढत आहे. कोरोनापुर्वी आगारातून 52 बस सोडण्यात येत होत्या. मात्र सध्या केवळ 39 बस सोडण्यात येत असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. याशिवाय करंजा ते मोरा बससेवा सुरू करावी. गौरीगणपती सणानिमित्त कोकणात व घाटमाथ्यावर गाड्या सुरू कराव्यात, आदी मागण्याही यावेळी करण्यात आल्या. यावेळी आगार व्यवस्थापकांनी जादा गाड्या सोडण्याबाबत कार्यवाही करण्यात येणार असल्याचे सांगितले.