। मुंबई । वृत्तसंस्था ।
कोरोनामुळे लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीच्या काळात अमली पदार्थांची खरेदी-विक्री करणारी टोळी अधिक सक्रिय झाल्याचे पोलिसांनी केलेल्या कारवाईवरून दिसून येत आहे. मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी कक्षाने 2019 मध्ये केलेल्या कारवाईत वर्षभरात 514 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये 716 किलोचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले असून एकूण 595 आरोपींना अटक करण्यात आली आहे.
टाळेबंदीच्या वर्षात (2020) 414 गुन्ह्यांमध्ये 1,023 किलो साठा पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. तर 2021 मध्ये यामध्ये तिपटीहून अधिक वाढ झाली. 2021 वर्षात अवघ्या दहा महिन्यात 443 कारवाईत 3,835 किलोंचा अमली पदार्थांचा साठा पोलिसांनी जप्त केला आहे. या तिन्ही वर्षात सुमारे 500 व्यक्तींना अटक करण्यात आले आहे.
शहरांबरोबरच ग्रामीण भागातील तरुणही या व्यसनांच्या आहारी जात आहेत. राज्यातील अमली पदार्थांचे वाढते व्यवहार रोखण्याकरिता गृह विभागाने प्रत्येक जिल्ह्यात पोलीस अधीक्षक यांचे अमली पदार्थविरोधी कक्ष निर्माण करण्याचे ठरविले आहे. गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी नुकतेच असे निर्देश दिले आहेत.