वाढीव वीजबिलांचा जनतेला शॉक

ग्राहकांना अंदाजे मोठ्या रकमेची वाढीव बिले
। पाली/बेणसे । प्रतिनिधी ।
शिहू बेणसे विभाग वाढीव विजबिलानी हैराण झालाआहे. ग्राहकांच्या माथी अंदाजे व मोठ्या रकमेची वाढीव बिले मारली जात आहेत. त्यामुळे येथील नागरिक संतप्त झाले आहेत. शिहू येथील ग्राहक मोहन पाटील यांना तब्बल 51 हजार 720 रुपयांचे वीज बिल आल्याने त्यांना चांगलाच शॉक बसला आहे. वीजबिल तात्काळ भरण्याची सक्ती केली जात आहे.
वीज बिल भरण्यास विलंब झाल्याने त्यांचा विद्युत पुरवठा खंडित केला आहे. विजवीतरणच्या अजब कारभाराला कंटाळून शेतकरी असलेल्या मोहन पाटील यांनी आत्महत्येचा इशारा दिला आहे. पाटील यांनी सांगितले की कोरोना काळात आम्ही नित्यनेमाने वीज बिल भरत आलो आहोत. मात्र मीटर वरून रिडींग न घेता अंदाजे विशिष्ट रक्कम ग्राह्य धरून त्या नुसार वीज बिल दिले जात आहे. सरासरी वीज बिलांच्या दुप्पट व चार पट वीज बिलाची रक्कम येऊ लागल्याने कोरोना महामारीत ही बिले कशी भरणार असा सवाल संतप्त ग्राहकांनी उपस्थित केलाय.
वाढीव वीज बिलाची ओरड एक दोन ग्राहकांची नाही तर शेकडो ग्राहक, सर्वसामान्य गोरगरीब विजवीतरण विभागाच्या मनमानी व हंम करे सो या जुलमी कारभाराला बळी पडले आहेत. सक्ती, धपटशाहीमुळे नागरिक तणावात आहेत. विजेसाठी विजवीतरण शिवाय अन्य पर्याय नसल्याने हुकूमशाही केली जात असल्याचा संताप नागरिक व्यक्त करत आहेत.कोरोना काळात नोकरी धंदा नाही, घरात केवळ दोन पंखे व दोन ब्लब आहेत. इतर उपकरणे नसताना आलेली भरमसाठ बिले भरणार कशी? कोरोना काळात नोकरी धंदे बंद आहेत, जगावे कसे हा प्रश्‍न पडला आहे.

Exit mobile version