मनोज जरांगे यांच्या सुरक्षेत वाढ

। मुंबई । प्रतिनिधी ।

मराठा आरक्षण लढ्याचं नेतृत्व सांभाळणारे मनोज जरांगे पाटील यांच्या सुरक्षेमध्ये वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मंत्री शंभुराज देसाई यांनी याबाबत माहिती दिली. काही दिवसांपूर्वी अंतरवाली सराटी गावात रात्रीच्या वेळी ड्रोन कॅमेर्‍याद्वारे टेहळणी झाली होती. मनोज जरांगे पाटील यांचं घर आणि उपोषणस्थळाच्या भोवती ड्रोन कॅमेर्‍याने पाळत ठेवल्याचा संशय होता. त्यानंतर मराठा समाजाने आक्रमक होत मनोज जरांगेंना झेड प्लस सुरक्षा देण्याची मागणी केली होती. बुधवारी (दि.3) जरांगे पाटलांना झेड प्लस सुरक्षा देण्याच्या मागणीसाठी छत्रपती संभाजी नगर येथे सकल मराठा समाजाच्या वतीने रास्ता रोको करण्यात आला. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या अंतरवली सराटी येथील ते राहतात त्या निवासस्थानी आणि आंदोलनाच्या ठिकाणी रात्रीच्या वेळी काही अज्ञात ड्रोनद्वारे टेहळणी केल्याचा प्रकारसमोर आल्यानंतर राज्यभरातून त्यांना सुरक्षा पुरवण्याची मागणी होत होती. मनोज जरांगे पाटलांना सुरक्षा देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून पाटलांसोबत आता चार शस्त्रधारी पोलीस आणि एक पोलीस व्हॅन तैनात असेल, असे मंत्री शंभुराज देसाई यांनी सांगितले.

Exit mobile version