कोरोना काळात महिला अत्याचारात वाढ

। नागपूर । वृत्तसंस्था ।
कोरोनाच्या पहिल्या व दुसर्‍या लाटेदरम्यान लागलेल्या कडक टाळेबंदी व निर्बंधामुळे नागरिक मोठ्या संख्येने घरात होते. त्यानंतरही या काळात उपराजधानीत महिला तस्करी, बलात्कार, बाललैंगिक गुन्ह्यांमध्ये वाढ झाल्याचा प्रकार माहिती अधिकारातून सामाजिक कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी पुढे आणला आहे.
उपराजधानीत कोरोनाची पहिली लाट मार्च 2020 मध्ये सुरू झाली. त्यानंतर प्रथम काही महिने कडक टाळेबंदी होती. त्यानंतर हळूहळू टाळेबंदी शिथिल होत असली तरी कडक निर्बंध होते. त्यामुळे पूर्वीच्या तुलनेत नागरिक कमी प्रमाणात घराबाहेर होते. त्यानंतरही उपराजधानीत 2019 या वर्षाच्या तुलनेत करोना विषाणूचे संक्रमण असलेल्या 2020 आणि 2021 ऑगस्ट महिन्यापर्यंत महिला तस्करी, बलात्कार, बाललैंगिक गुन्ह्यामध्ये वाढ झाल्याचे दिसत आहे. 2019 मध्ये उपराजधानीत महिला तस्करीचे 18, बलात्काराचे 136, बाललैंगिक अत्याचार पोक्सोचे 200 गुन्हे दाखल होते. 2020 मध्ये त्यात वाढ होऊन 33 महिला तस्करी, 172 बलात्कार, 238 पोक्सोचे गुन्हे नोंदवले गेले आहेत. तर 1 जानेवारी 2021 ते ऑगस्ट 2021 या आठ महिन्यात येथे महिला तस्करीचे 10, बलात्काराचे 149, बाललैंगिक पोक्सोचे 142 गुन्हे दाखल झाल आहेत.

Exit mobile version