। नंदुरबार । प्रतिनिधी ।
नंदुरबार लोकसभा मतदार संघाचा निवडणुकीत गेल्या तीन पंचवार्षिकपासून मतदानाचा टक्का थोड्या फार फरकाने का होईना वाढत आहे. याही वर्षी सरासरी दोन टक्के मतदान वाढले आहे. दोन टक्के असले तरी ते सुमारे पावणे तीन लाख मतदान आहे. वाढलेल्या या पावणेतीन लाखांचा धनी कोण, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. वाढीव मतदान ज्याच्या पथ्यावर पडेल, तो नंदुरबारचा खासदार, असे गोळा बेरीज करत चर्चा रंगू लागल्या आहेत.
नंदुरबार लोकसभा मतदार संघात 2014 पासून विचार केल्यास नंदुरबार लोकसभेसाठी सरासरी 63 टक्के मतदान झाले होते. तर 2019 ला 68.33 टक्के मतदान झाले होते. अत्यंत अटीतटीच्या लढतीत काँग्रेसचे उमेदवार अॅड के.सी.पाडवी यांना पराभूत करीत डॉ. हिना गावित 95 हजार पाचशे मतांनी विजयी झाल्या होत्या. मागील पंचवार्षिक निवडणुकीत तुलनेत दोन टक्यांनी मतदान वाढले. हे वाढलेले मतदान कोणाच्या पथ्यावर पडते हे सांगणे कठीण आहे. कारण भाजपच्या उमेदवार डॉ. हिना गावित यांच्यासमोर काँग्रेसचे अॅड. गोवाल पाडवी उमेदवार आहेत. त्यांनी स्वपक्षासह भाजपमधील नाराज गट, महायुतीतील मित्र पक्ष यांना आपलेसे करीत त्यांची मदत घेतली आहे. त्यामुळे वाढलेले मतदान ज्याचा पथ्यावर पडेल, त्याला नक्कीच नंदुरबारची जनता खासदार म्हणून स्विकारेल, अशी चर्चा आहे.