अती उष्णतेमुळे थंडपेयांना वाढती मागणी

सरबतांच्या दरातही वाढ

। तळा । वार्ताहर ।

वाढत्या उष्णतेमुळे शरीराला थंडावा देण्यासाठी तळा बाजारपेठेत नागरिकांची पाऊले थंड पेयांकडे वळली आहेत. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासूनच उष्णतेचे प्रमाण वाढले असल्याने या उष्णतेपासून वाचण्यासाठी नागरिकांकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत.

उष्णतेचे प्रमाण वाढू लागल्याने तसेच उन्हातून काम करताना थकलेल्या शरीराला थंडावा देण्यासाठी नागरिकांची पाऊले थंडपेयांच्या दुकानांकडे वळत आहेत. यासाठी बाजारपेठेत संत्री, मोसंबी, अननस, लिंबू सरबत, कोकम सरबत, उसाचा रस यांसारखे विविध थंडपेये विक्रीसाठी उपलब्ध झाले आहेत. मात्र, गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी फळांच्या किंमतीत वाढ झाल्याने या थंड पेयांच्या किमतीत वाढ झाली आहे. यामुळे वाढलेल्या महागाईचा फटका सर्वसामान्यांना बसत आहे.

फळांच्या किंमतीत वाढ
सरबतांच्या वाढलेल्या किमतीचे प्रमुख कारण म्हणजे फळांचे वाढलेले दर. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी फळांच्या दरामध्ये वाढ झाली आहे. ज्यामध्ये 160 रुपये किलो मिळणारे सफरचंद आता 200 रुपये किलोप्रमाणे मिळत आहेत. 60 रुपये किलो मिळणारे अननस आता 100 ते 120 रुपये किलो प्रमाणे मिळत आहे. यांसह संत्री व मोसंबीच्या दरातही वाढ झाली असून 90 रुपये प्रति किलो मिळणारे संत्री व मोसंबी आता 120 रुपये प्रति किलो प्रमाणे मिळत आहेत. फळांच्या या वाढलेल्या दरामुळे बाजारपेठेत सरबतांच्या किंमतीही वाढल्या आहेत.

सरबतांचे दर

सरबतगेल्यावर्षीचा दरसध्याचा दर
संत्री3040
मोसंबी3040
सफरचंद3040
अननस2535
ऊस1520
लिंबू2030

गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी सरबतांच्या किमतीत वाढ झाली आहे. लिंबूचे दर खूप वाढल्यामुळे लिंबू सरबतही महागले आहे. तसेच, सफरचंद, मोसंबी, संत्री, अननस या फळांच्या वाढलेल्या किमतींमुळे त्यांच्या सरबतांचे दर देखील वाढले आहेत. साधारणपणे 10 ते 15 रुपयांची वाढ प्रत्येक सरबताच्या ग्लासमध्ये झालेली आहे.

दत्ता साळुंखे, सरबत विक्रेता
Exit mobile version