पोलिसांची गस्त वाढविण्याची मागणी; अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन
। रोहा । प्रतिनिधी ।
रोहे शहर व तालुक्यातील ग्रामीण भागात घरफोडी व चोरीच्या सतत घटना घडत असल्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. या चोरीच्या घटना रोखण्यासाठी रोह्यातील पोलीस स्टेशन येथे पोलीस निरीक्षक मारुती पाटील यांची भेट घेऊन या भेटीत वाढत्या गुन्हेगारी घटनांबाबत चिंता व्यक्त करत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली असून, या संदर्भात लेखी निवेदन देण्यात आले आहे. या शिष्टमंडळात अमित घाग, रोशन चाफेकर, सचिन मोरे, वैभव कुलकर्णी, दिपक मोरे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
भेटीदरम्यान रोहा शहर व तालुक्यातील काही भागांमध्ये घडलेल्या घरफोडीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये निर्माण झालेल्या असुरक्षिततेच्या भावनेबाबत पोलीस प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले. रात्रीची गस्त अधिक प्रभावी करणे, संशयितांवर विशेष लक्ष ठेवणे, सीसीटीव्ही कॅमेरे फुटेजची बारकाईने तपासणी करणे तसेच संवेदनशील भागात अतिरिक्त बंदोबस्त ठेवण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
पोलीस निरीक्षक मारुती पाटील यांनी या प्रकरणांचा तपास वेगाने सुरू असून, डॉग स्क्वाड व तांत्रिक पथकाच्या मदतीने तपासाची प्रक्रिया गतीमान करण्यात आल्याची माहिती दिली. तसेच नागरिकांच्या सहकार्याने आरोपींना लवकरात लवकर जेरबंद करण्याचा विश्वास व्यक्त केला. यावेळी रोहा पोलीस प्रशासनाकडून तातडीने आणि जबाबदारीने सुरू असलेल्या कारवाईचे शिष्टमंडळाने कौतुक केले. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यातील समन्वय अत्यंत महत्त्वाचा असल्याचेही यावेळी अधोरेखित करण्यात आले. दरम्यान, नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता सतर्क राहावे, संशयास्पद हालचाली आढळल्यास त्वरित 112 या हेल्पलाईनवर किंवा स्थानिक पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले. रोहा तालुक्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी प्रशासन सज्ज असून गुन्हेगारांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल असा विश्वास व्यक्त करण्यात आला.







