म्हसळ्यात बिबट्याचा वाढता संचार

| म्हसळा | प्रतिनिधी |

म्हसळा तालुक्यात गेल्या काही महिन्यांपासून बिबट्याच्या संचारात वाढ झाल्याचे समोर येत आहे. चिरगाव, म्हसळा दुर्गवाडी, नेवरूळ, घूम, पाष्टी, मोरवणे, देहन आणि खामगाव या ग्रामीण भागात बिबट्याचे वास्तव्य अधूनमधून स्थानिकांच्या निदर्शनास येत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

दोन दिवसांपूर्वी म्हसळा परिसरातील जंगलात एका शेतकऱ्याला बिबट्याची दोन पिल्ले आढळून आली असून या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. वन विभागाने तात्काळ पथके घटनास्थळी पाठवून परिस्थितीची पाहणी केली असल्याची माहिती मिळाली आहे. गेल्या वर्षभरात तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यांमुळे किमान वीस ते तीस गोवंश जातीच्या जनावरांचा बळी गेल्याची नोंद वन विभागाकडे करण्यात आली आहे. सततच्या गोवंशाच्या हानीमुळे पशुपालक व शेतकरी वर्ग मोठ्या चिंतेत आहे. वन्यजीव संवर्धनाच्या दृष्टीने बिबट्याचे अस्तित्व महत्त्वाचे असले तरी ग्रामीण भागात त्याचा वाढता वावर लक्षात घेता संबंधित विभागाने योग्य ती खबरदारी घेऊन उपाययोजना राबवण्याची गरज व्यक्त केली जात आहे. परिसरातील नागरिकांना शक्य तितक्या सावधगिरीने वावर करण्याचे आवाहन वन विभागाकडून करण्यात येत आहे.

Exit mobile version