मोकाट गुरांची वाढती संख्या अपघाताला कारणीभूत

रस्त्यातच बसल्यामुळे अपघाताला आमंत्रण

| धाटाव | प्रतिनिधी |

रोहा-कोलाड मार्गावर मोकाट गुरांची वाढती संख्या अपघाताला कारणीभूत ठरत आहे. या रस्त्यावर जवळपास 40 ते 50 मोकाट गुरे बस्तान मांडत असल्याने रहदारीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. रस्त्यावरील अवजड वाहनांसह इतर चारचाकी व दुचाकीची चालकांना मोठा अडथळा निर्माण होत आहे. तसेच, वाहतूक कोंडीचा प्रश्न देखील भेडसावत आहे. गेल्या तीन महिन्यांपासून रस्त्यावरील ही मोकाट गुरे रहदारीला डोकेदुखी ठरत असल्याने या मोकाट जनावरांना वेसण घाला रे, असे म्हणण्याची वेळ आता स्थानिक नागरिकांवर आली आहे.

रोहा-कोलाड मार्गावरून दररोज हजारो वाहनांची वर्दळ सुरू असते. मुंबई पुण्यासारख्या ठिकाणाहून मुरूड व अलिबाग सारख्या पर्यटन स्थळी जाण्यासाठी हाच मार्ग सोयीस्कर आहे. त्यामुळे या मार्गावरून पर्यटकांचीही मोठी ये-जा आहे. त्यातच सध्या नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात सर्वत्र साजरा होत असताना प्रत्येक जण आपआपल्या कुलदेवतेच्या दर्शनानासाठी या मार्गावरून जात आहेत. धाटाव औद्योगिक वसाहतीत कारखाने असल्याने अवजड वाहनेही भरधाव जात आहेत. त्यातच या महामार्गावरील मोकाट गुरांची वर्दळ डोकेदुखी ठरत आहे. त्यामुळे रोहा-कोलाड रस्त्यावर मोकाट गुरांचा वाढता वावर ही एक गंभीर समस्या बनली आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी, अपघात आणि नागरिकांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण झाला आहे.

ही मोकाट गुरे रस्त्यावर ठाम मांडून बसत असल्याने भरधाव वेगाने येणाऱ्या वाहनचालकांना त्वरित वाहन नियंत्रणात आणणे शक्य होत नाही. त्यामुळे मोठा अपघात होऊन अनेकांना आपले जीव गमवावे लागले आहेत. तर, काहींना कायमचे अपंगत्व आले आहे. तसेच, अनेकांना आर्थिक बाबीलाही सामोरे जावे लागले आहे. तरी देखील संबंधित प्रशासन या मोकाट गुरांकडे कानाडोळा करीत असल्याने वाहनचालक व प्रवासी संताप व्यक्त करत आहेत. या मोकाट गुरांचा बंदोबस्त करून वाहन चालकांसह प्रवाशांचा प्रवास सुखकर करण्यासाठी उपाययोजना राबवण्यात यावी, अशी मागणी सध्या जोर धरत आहे. दरम्यान, अनेक ठिकाणी गुरे चोरांच्या टोळ्या ही सक्रीय असल्याची भीती असतानाही बिनधास्तपणे गुरे रस्त्यावर सोडली जातात. गुरे मालकांच्या निष्काळजीपणा आणि संबंधित प्रशासन या सर्वाला कारणीभूत ठरत आहेत. त्यामुळे मोकाट जनावरांना आता वेसण घाला रे, असे म्हणण्याची वेळ स्थानिक नागरिकांवर आली आहे.

गुरे मालकांवर कारवाईची मागणी
रोहा-कोलाड रस्त्याच्या मधोमध ग्रामीण भागातील गुरे बसलेली दिसतात. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत असून अपघात वाढत आहेत. या गुरांच्या मालकांनी घरी शांत झोपून गुरांना रस्त्यावर मोकाट सोडून देणे चुकीचे आहे. सर्वत्र गुरे चोरांची भीती असूनही मुक्या प्राण्यांना रस्त्यावर मोकाट सोडणाऱ्या मालकांवर संबंधित प्रशासनाने कारवाई करणे गरजेचे आहे, असे स्थानिक नागरीकांकडून बोलले जात आहे.

आम्ही रोजगारासाठी औद्योगिक वसाहतीत कारखान्यात तीनही शिफ्टमधे काम करीत असतो. रोहा-कोलाड रस्त्यावर सतत मोकाट गुरांचा ठिय्या बसलेला असताना रस्ता मोकळा नसल्याने वाट काढून जावे लागते. मात्र, रस्त्यावर फिरणाऱ्या गुरांमुळे कामगारवर्ग व शाळकरी मुलांना जीव मुठीत घेऊनच प्रवास करावा लागत आहे.

रामेश्वर वडले,
सुरक्षा कर्मचारी

Exit mobile version