आदिवासींचा सरकारविरोधात एल्गार

रायगडसह राज्यभर बेमुदत निर्णायक आंदोलन

| पनवेल | वार्ताहर |

आदिवासींचा विविध मागण्यांचा शासन दरबारी निर्णय होत नसल्याच्या निषेधार्थ शुक्रवारी (दि. 21) पनवेलसह रायगड जिल्हा, पालघर, ठाणे, नाशिक या ठिकाणी बेमुदत निर्णायक आंदोलन छेडण्यात आले आहे.

श्रमजीवी संघटना-महाराष्ट्रचे अध्यक्ष रामाभाऊ वारणा यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवारी हे आंदोलन विविध ठिकाणी छेडण्यात आले असून, पनवेल येथे रायगड सरचिटणीस बाळाराम भोईर, रायगड जिल्हाध्यक्ष हिरामण नाईक, सरपंच कुंदा पवार, आदिवासी संघटनेचे नेते गणपत वारगडा आदींच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन छेडण्यात आले असून, यामध्ये आदिवासी बांधवांचे अनेक मूलभूत हक्कांचे प्रश्‍न, देशाच्या स्वातंत्र्याला 77 वर्षांनंतरही प्रलंबित आहेत. त्यांचा रोजगार, पिण्याचे पाणी, गावठाण, घराखालील जागा, जातीचा दाखला, रेशनिंग, शिक्षण, आरोग्य तसेच अनुसूचित जमाती व अन्य पारंपरिक वनहक्काची मान्यता आदींसह हर घर नळ से जल पाणी योजना यासंदर्भात या बांधवांना डावलण्यात येते. तसेच त्यांना हक्काच्या योजना मिळत नसल्याने हे आंदोलन छेडण्यात आले होते.

शासनाने याची वेळीच दखल न घेतल्यास येत्या 23 सप्टेंबर रोजी रायगड, नाशिक, ठाणे, पालघर जिल्ह्यातील सर्व पंचायत समिती कार्यालयात हे आदिवासी बांधव ठिय्या मांडून बसणार आहेत. तसेच दि.25 सप्टेंबर रोजी हजारो आदिवासी बांधव त्या त्या ठिकाणावरुन पायी मंत्रालयाकडे धडक देऊन संविधानाच्या अमृतमहोत्सवी वर्षी आपला अधिकार मिळविण्याकरिता अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अशा पद्धतीचे मुक्कामी आंदोलन छेडणार असल्याची माहिती सरचिटणीस बाळाराम भोईर यांनी दिली.

Exit mobile version