| पनवेल | प्रतिनिधी |
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना न्याय मिळणेबाबत शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षातर्फे राज्यव्यापी आंदोलन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर बुधवारी (दि.8) पनवेल तहसील कार्यालय येथे आंदोलन करण्यात आले. यावेळी नायब तहसिलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी राजश्री जोगी यांना निवेदन देण्यात आले.
अतिवृष्टीमुळे झालेल्या पीक नुकसानीसाठी शेतकऱ्यांना कर्जमाफी व सरसकट हेक्टरी 50 हजार रुपयांची मदत मिळावी. तसेच, नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सर्व कर्जातून कर्जमुक्त करावे, अतिवृष्टीमुळे घरे व पशुधनाचे नुकसान झालेल्या नागरिकांना जुने निकष न लावता योग्य आणि पुरेसा मोबदला त्वरित देण्यात यावा, पिक विम्याचे कठीण निकष तातडीने शिथिल करून पंचनाम्याची प्रक्रिया बाजूला ठेवत विम्याची रक्कम तरी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी, अशा प्रकारच्या प्रमुख मागण्यांचे निवेदन देण्यात आले. तसेच या सर्व मागण्या लवकरात लवकर पूर्ण करण्यात याव्या, अन्यथा शिवसेनेच्यावतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देखील देण्यात आला. यावेळी शिवसेना उपनेते बबनदादा पाटील, जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांच्यासह महिला आघाडी, कार्यकर्ते आणि शिवसेना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.







