अन्यायाविरोधात शेतकर्‍याचे बेमुदत उपोषण

| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
पनवेल तालुक्यातील वावंजे तलाठी सजामध्ये विक्री केलेल्या जमिनीच्या आकारफोडीची चुकीची नोंद केली आहे. सर्वे नंबर 123 / 2 या सातबारावरील अर्धीच जमीन विक्री केली असताना हा संपूर्ण सातबारा तलाठ्यांमुळे दुसर्‍याच्या नावावर झाला आहे. शेतकर्‍याच्या ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी महसूल दरबारी आपली कैफियत मांडली. महसूल विभागाच्या त्यांची चूक निदर्शनात आणून देखील सातबारावर अद्यापही शेतकर्‍याचे नाव लावण्यात आले नाही. या महसूल विभागाच्या अन्यायामुळे त्रस्त होऊन वावंजे येथील सुनील गोंधळी यांनी आपल्या काकांना न्याय मिळवून देण्यासाठी रायगड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण छेडले आहे. उपोषणकर्ते सुनील गोंधळी यांनी तलाठी ते तहसीलदार यांच्या कर्तव्य कसुरतेचा पाढा जिल्हाधिकारी रायगड यांच्याकडे निवेदनाद्वारे वाचला आहे.

वावंजे येथील नामदेव गोंधळी यांची वडिलोपार्जित जागा सर्वे नंबर 123 / 2 मध्ये आहे. या जागेचे क्षेत्र 38. 70 गुंठे आहे. या जागेत नामदेव गोंधळी आणि परशुराम गोंधळी यांची नावे सातबारा सादरी होती. नामदेव गोंधळी यांनी त्यांच्या हिश्श्याची 19. 35 गुंठे जागा खरेदीखताने विक्री केली होती. परंतु जागा खरेदी करणार्‍याने स्वतः जागा खरेदी न करता दुसर्‍याला ती जागा खरेदी करून दिली. हा जागेचा व्यवहार करताना नामदेव गोंधळी यांची जागा खरेदी करणार्‍यांनी बनावट नकाशा लावून 19. 35 गुंठे जागेऐवजी 38. 70 गुंठे जागा खरेदी केल्याचे भासवून तलाठ्यांकरवी सातबारा सदरी नोंद करून घेतली असल्याचा आरोप शेतकरी नामदेव गोंधळी यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात केला आहे.

Exit mobile version