श्रमिक हातरिक्षा संघटनेचे बेमुदत उपोषण

| माथेरान | प्रतिनिधी |

सात महिने उलटून देखील ई-रिक्षा चाचणी अहवाल सनियंत्रण समितीने सर्वोच्च न्यायालयात सादर केला नाही. त्यामुळे श्रमिक हातरिक्षा संघटनेकडून तीव्र संताप व्यक्त होत आहे. या विरोधात येथील श्रमिक हातरिक्षा चालक-मालक संघटनेने कुटुंबासहित गुरुवारपासून बेमुदत उपोषण सुरु केले. तीन दिवसांपूर्वी हातरिक्षा बंद ठेवण्यात आल्या होत्या.

सर्वोच्च न्यायालयाने तीन महिन्यांच्या प्रयोगीग तत्वावर ई-रिक्षा चालविण्यास परवानगी दिली होती. त्यानंतर ई-रिक्षाबाबत सनियंत्रण समितीकडून पुढील एक महिन्यात न्यायालयात अहवाल सादर करणे आवश्यक होते. मात्र, सात महिने उलटून देखील अहवाल सादर न झाल्यामुळे लाखो रुपये खर्च करून आणलेल्या ई-रिक्षा सध्या धूळखात पालिका आवारात पडल्या आहेत. येथील शालेय विद्यार्थी,जेष्ठ नागरिक व दिव्यांगांसाठी तसेच येथे माथेरानला येणाऱ्या वयोवृद्ध पर्यटकांसाठी ई-रिक्षा एक वरदानच होती. सर्वप्रथम 16 ऑक्टोबरपासून हातरिक्षा बेमुदत बंद करण्यात आल्या होत्या. गुरुवारपासून आंदोलनाची धार अधिक तीव्र करण्यात आली आहे.

संघटनेकडून माथेरानमधील सर्व राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, हॉटेल आणि लॉजिंग संघटना यांना सर्वांना पत्र व्यवहार करून आंदोलनात सामील होऊन सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. श्रमिक हातरिक्षा संघटनेला येथे अनेक संघटनांनी पाठिंबा देखील दर्शविला आहे.

Exit mobile version