। अलिबाग | प्रतिनिधी ।
भारतीय स्वातंत्र्याच्या ८० व्या वर्धापन दिनानिमित्त रायगड जिल्ह्यात विविध ठिकाणी उत्साहात ध्वजारोहण समारंभ पार पडला. यानिमित्त पीएनपी एज्युकेशन सोसायटीच्या ग्रामीण भागातील विविध शाळा व महाविद्यालयांमध्ये सामाजिक, शैक्षणिक तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
अलिबाग तालुक्यातील वेश्वी येथील पीएनपी एज्युकेशन सोसायटीच्या संकुलातही स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. पीएनपी प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका रिना म्हात्रे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्रशासन अधिकारी गबाजी गीते, माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक निलेश मगर, पीएनपी होली चाईल्ड सीबीएसई शाळेच्या मुख्याध्यापिका वेल्लईम्मल्ल वेणी, होली चाईल्ड स्टेट बोर्डच्या मुख्याध्यापिका निसर्गा चेवले, पीएनपी कॉलेजचे प्राचार्य डॉ. ओमकार पोटे, प्राचार्य रविंद्र पाटील, बी.एड. कॉलेजच्या प्रा. रुतिषा पाटील, महाविद्यालयाचे संचालक विक्रांत वार्डे, जनसंपर्क अधिकारी अमोल नाईक, क्रीडा प्रशिक्षक तेजस म्हात्रे, अक्षय डाकी यांच्यासह इतर मान्यवर, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांवर आकर्षक नृत्याविष्कार सादर केला. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे संपूर्ण पीएनपी संकुलात देशभक्तीमय वातावरण निर्माण झाले होते. कार्यक्रमादरम्यान उपस्थितांनी स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाचे स्मरण करत देशाच्या प्रगतीसाठी योगदान देण्याचा संकल्प केला.






