विधानपरिषदेसाठी अपक्षांची मनधरणी

पवारांची मविआ नेत्यांना सूचना
| मुंबई | प्रतिनिधी |

नुकत्याच झालेल्या राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या गोटातील अपक्ष आमदारांची मतं फुटल्याने शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव झाला होता. या सगळ्या प्रकाराविषयी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार मुंबईत सोमवारी शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची बैठक झाली. यावेळी शरद पवार यांनी राज्यसभा निवडणुकीत मविआची मते फुटल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. आता विधानपरिषद आणि राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत काळजी घ्यावी, अशा सूचना शरद पवार यांनी आमदारांना दिल्या आहेत. राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेच्या संजय पवार यांच्या पराभवासाठी अपक्षांची नाराजी कारणीभूत ठरली होती. त्यामुळे आता शरद पवार यांनीच पुढाकार घेत अपक्षांची नाराजी दूर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. येत्या 20 जूनला विधानपरिषदेची निवडणूक होणार आहे. त्यापूर्वी अपक्ष आमदारांना एकत्र बसवून त्यांची नाराजी दूर करा, अशा सूचना शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि बाळासाहेब थोरात यांना दिल्याची माहिती आहे.


राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेशी दगाबाजी करणार्‍या नेत्यांमध्ये संजय राऊत यांनी देवेंद्र भुयार यांचे नाव घेतले होते. या पाश्‍वर्र्भूमीवर देवेंद्र भुयार यांनी राऊत यांची भेट घेऊन आपली बाजू मांडली होती. त्यानंतर संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला होता. तेव्हा राऊत यांनी म्हटले की, देवेंद्र भुयार यांनी माझ्यासमोर त्यांचे म्हणणे मांडले. मला ते प्रामाणिकपणे बोलत होते, असे वाटले. देवेंद्र भुयार यांनी बोलून दाखवलेल्या भावना खर्‍या आहेत. या भावना मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचवेन, असेही संजय राऊत यांनी सांगितले.

Exit mobile version