विरोधकांची मोट बांधणाऱ्या नेतृत्वाची गरज
। रायगड । प्रतिनिधी ।
राज्यातील राजकीय घडामोडीं घडल्यानंतर आता रायगड जिल्ह्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे आपल्याच बाजूने उभे राहावेत यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटात चुरस निर्माण झाली आहे. शरद पवार यांच्या विरोधात जाऊन खा.सुनील तटकरे हे सत्तेमध्ये सहभागी झाल्याचा निर्णय जिल्ह्यातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांना रुचलेला नाही. तटकरे यांना शह देण्यासाठी शरद पवार समर्थक आता एकवटू लागले आहेत.
खासदार तटकरे यांच्यावर नाराज असलेले माजी आमदार सुरेश लाड तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दत्तात्रय मसूरकर यांच्याकडे आशेने पाहिले जात आहे. तटकरे यांच्या विरोधातील सर्वांना एकत्र करुन त्यांची मोट बांधणारे नेतृत्व जिल्ह्यात निर्माण होणे गरजेचे आहे. रायगड जिल्ह्याचा विचार केल्यास तटकरे यांनी राजकारण करताना अनेकांना दुखावले आहे. त्यामध्ये स्वर्गिय माणिक जगताप, मधूकर ठाकूर, माजी आमदार सुरेश लाड, ॲड. महेश मोहिते, सुरेश टोकरे अशी अन्य बरीच नावे आहेत.कुटुंबामध्येही तटकरे यांनी आपले बंधू अनिल तटकरे आणि पुतणे अवधूत तटकरे यांचेही खच्चीकरण केले. कदाचित तटकरे यांचे राजकारण हे त्यांच्या दृष्टीने बरोबर असेलही मात्र जे दुखावले त्यांचे काय असा प्रश्न उपस्थित होतो. दुखावलेल्या या नेत्यांनी बऱ्याच जाहीर कार्यक्रमात आपली नाराजी बोलून दाखवली आहे.
तटकरे हे नेहमीच सत्तेमध्ये राहीले आहेत. सत्तेत राहून त्यांनी महत्वाची मंत्रीपदे उपभोगली आहेत. याच माध्यमातून त्यांनी आपली कन्या अदिती आणि मुलगा अनिकेत यांचा राजकीय भवितव्याला आकार दिला आहे. चांगल्या वाईट प्रसंगी शरद पवार हे तटकरे यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले आहेत. याचा विसर तटकरे यांना पडला असला, तरी रायगडातील जनता मात्र नक्कीच विसरलेली नाही. आगामी होणाऱ्या निवडणुकीत तटकरे यांना याची किंमत चुकती करावी लागण्याची शक्यता नाकारता येणार नाही. जिल्ह्यामध्ये शरद पवार यांना मानणारा गट आहे. नाराज आणि विरोधकांना एकत्र करुन त्यांची मोट बांधणारे नेतृत्व सध्या दिसत नसले, तरी सुरेश लाड आणि दत्तात्रय मसुरकर यांच्याकडे आशेने पाहीले जात असल्याचे चित्र आहे. शरद पवार गटाने लवकरच अशा चेहऱ्याची निवड करुन त्यांच्या पाठीशी सर्व पाठबळ उभे करणे गरजेचे आहे.
सुरेश लाड यांनी अद्यापही आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. तसेच दत्तात्रय मसुरक हे देखील राजकीय घडामोडींवर लक्ष ठेऊन आहेत. शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस स्थापन केली तेव्हा पहिल्यादा मी त्यांच्या सोबत होतो. तटकरे हे माझ्या नंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आले, असे दत्तात्रय मसूरकर यांनी कृषीवलीशी बोलताना सांगितले. नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते हे सातत्याने विचारत आहेत. आपण कोणती भूमिका घ्यायची. राजकीय भवितव्य असेल त्या बाजूने योग्य तोच निर्णय लवकरच घेऊ असे सांगितल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.