इंडिया आघाडीचे उमेदवार अनंत गीतेंचा टोला
। अलिबाग । प्रतिनिधी ।
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधक माझ्यावर वेगवेगळे आरोप, टीका करीत आहेत. कोणी काय उपमा द्यायची हे त्या व्यक्तीवर अवलंबून आहे. ज्याची जशी कुवत असते, तसे त्याच्या मुखातून शब्द बाहेर पडतात. त्यामुळे विरोधकांच्या टीकेला गांभीर्याने घेण्याची गरज नाही, असा टोला इंडिया आघाडीचे उमेदवार तथा माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांना लगावला.
इंडिया आघाडीमधील घटक पक्षातील शेकापचे नेते आ. जयंत पाटील, काँग्रेसचे अॅड. प्रवीण ठाकूर, आ. भास्कर जाधव, माजी आ. अनिल तटकरे यांच्या उपस्थितीत सोमवारी (दि. 15) उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला, यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी अनंत गीते म्हणाले की, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी माझी अधिकृत उमेदवारी जाहीर केली आहे. त्याच वेळेला इंडिया आघाडीने माझ्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केले. अन्य कोणी माझ्या नावाने अर्ज दाखल केला आहे, त्याची दखल घेण्याची अजिबात गरज नाही. निवडणूक ही स्वच्छ वातावरण होण्याची आवश्यकता आहे. शेवटी निर्णय हा मतदार, जनता करणार आहे. मतदारांचा निर्णय अंतिम राहणार आहे. ज्यांना राजकारण करायचे आहे, त्यांना राजकारण करू द्या, त्यांच्याशी काही देणे-घेणे नाही.
शेवटची सभा अलिबागमध्ये पाच तारखेला होणार आहे. यावेळी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह अनेक नेते मंडळींची प्रमुख उपस्थिती असणार आहे. याअगोदर शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखालीदेखील सभा होणार असल्याचे अनंत गीते यांनी सांगितले. राज्यात सुरु असलेल्या गलिच्छ राजकारणाविरोधात ही लढाई आहे. देशात सुरु असलेली हुकूमशाही रोखण्यासाठी या निवडणुकीला सामोरे जात आहे. मोदी सरकारच्या मनमानी कारभाराबाबत जनतेमध्ये प्रचंड चीड निर्माण झाली आहे. या निवडणुकीत भाजपविरोधात असलेली चीड मतदार मतदानातून दाखविणार असा विश्वासही गीतेंनी व्यक्त केला.