| खोपोली | प्रतिनिधी |
खालापूर तालुक्यातील 22 ग्रामपंचायतीच्या निवडणूक जाहीर झाली आहे. या निवडणुकीत माजगांव ग्रामपंचायत प्रभाग क्र.2 मधून इंडिया आघाडीच्या सरीता कमलाकर वाघे यांचा एकमेव उमेदवारी असल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली. या विजयाबाबत कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला आहे. निवडणुकीत इंडिया आघाडी चांगलीच मंसुडी मारेल, असा विश्वास आरपीआयचे जिल्हा कार्याध्यक्ष अविनाश कांबळे यांनी व्यक्त केला.
खालापूर तालुक्यातील 22 ग्रामपंचायतीच्या निवडणूका 5 नोव्हेंबर रोजी होणार आहेत. ग्रामपंचायतीमधील इच्छुक उमेदवारांनी आपल्या कार्यकर्त्यांसह शक्तीप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज भरले होते. माजगांव ग्रुपग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेना (ठाकरे गट), राष्ट्रवादी (शरद पवार गट), काँग्रेस, शेकाप, आरपीय आणि मनसे इंडि आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढवित आहेत.
शिवसेनेच्या दिपाली पाटील थेट सरपंचपदाची निवडणूक लढवित आहेत. प्रभाग क्र.2 मधून सरिता कमलाकर वाघे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. सोमवारी छाननीत वाघे यांचा एकमेव उमेदवारी अर्ज होता आणि तो वैध ठरला. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत इंडिया आघाडीने खाते उघडल्याने शिवसेना तालुका प्रमुख एकनाथ पिंगळे, ज्येष्ठ नेते आत्माराम पाटील यांनी वाघे यांचे अभिनंदन केले.
याप्रसंगी माजी उपसरपंच राजेश पाटील, शिवसेनेचे किशोर पाटील, नरेश पाटील, मंगेश जाधव, रवी पाटील, शेकापचे विलास कांबळे, काँग्रेसचे सुरेश महाब्धी,राष्ट्रवादीचे सुधाकर महाब्धी, दिलीप काठावळे, जयेश पाटील, मंगेश शिंदे, थेट सरपंचपदाच्या उमेदवार दिपाली पाटील तसेच अपर्णा शिंदे यांच्यासह इंडिया आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.