बोर्लीपंचतन येथे इंडिया आघाडीचा मेळावा

| बोर्ली पंचतन । वार्ताहर |

आज आपला देश फक्त दोनच माणसं चालवत आहेत. ज्या संघाच्या जीवावर ते मोठे झालेत त्या संघालासुध्दा त्यांनी संपवलं आहे का? म्हणूनच ते भारत सरकार नाही तर मोदी सरकारचा प्रचार करीत आहेत. हा देश तुमची खाजगी मालमत्ता आहे का? असा सवाल रायगड लोकसभा मतदार संघाचे इंडीया आघाडीचे उमेदवार अनंत गीते यांनी श्रीवर्धन तालुक्यातील बोर्ली पंचतन येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर सभागृहात शनिवारी (दि.27) झालेल्या जाहीर मेळाव्यात केला.

आज आपल्या देशाची लोकशाही आणि संविधान संकटात आहे. जगाला आदर्श वाटावं असं आपलं राष्ट्र आहे. जेवढे प्रांत तेवढ्या भाषा, जाती, धर्म आहेत तरीसुध्दा आपण एक आहोत देशाच्या या एकतेला आणि अखंडतेला सुरुंग लावण्याचं काम आज भाजपा करीत आहे. म्हणूनच इंडीया आघाडीच्या माध्यमातून निर्माण झालेल्या वज्रमुठीने या सत्तेला आपण सुरुंग लावायचा आहे. तटकरे आता ज्या घरात आहेत त्या घरात ते उद्या असतील की नाही माहित नाही. उद्या जर अजित पवार गटाला वाईट दिवस आले, तर अजित पवारांना सोडून ते भाजपात उडी मारतील आणि जर भाजपाला वाईट दिवस आले तर काँग्रेसमध्ये जातील. असा घणाघात यावेळी अनंत गीतेंनी केला.

सर्वहारा जन आंदोलनाच्या नेत्या उल्का महाजन यांनी उपस्थितांना संबोधीत करताना सांगितलं की मी कोणत्याही राजकीय पक्षाची सभासद किंवा कार्यकर्ती नाही. गेली 33 वर्षे मी विशेषता आदीवासी, बौध्द, दलीत वर्ग आणि कष्टकर्‍यांच्या हक्कासाठी कार्य करीत आहे. यापुर्वी आम्ही कोणत्याच राजकीय पक्षाच्या मंचावर कधीच गेलो नाही, पण यावेळची निवडणूक जरा वेगळी आहे या निवडणुकीमध्ये फक्त मीच नाही तर आमच्यासारखे अनेक संघटनांचे प्रतिनिधी इंडिया आघाडीच्या उमेदवारांना पाठिंबा द्यायला उतरले आहेत. कारण ही निवडणूक फक्त आपल्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी नाही तर केंद्रात आणि राज्यात सत्तेत असलेला भाजप ज्या पद्धतीने हुकूमशाही राबवतोय त्याच्या विरोधात आहे.यासाठी आपण मैदानात उतरलच पाहिजे नाहीतर हा देश वाचणार नाही. आपल्या पुढच्या पिढ्यांसाठी सुद्धा शिल्लक राहणार नाही असे त्यांनी सांगितले.

यावेळी काँग्रेसचे विजय तोडणकर, शेकापचे वसंत यादव यांनीसुध्दा तटकरेंच्या एकाधिकारशाहीवर आसूड ओढले. या मेळाव्याला इंडीया आघाडीतील विविध पक्षांचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version