अंधांच्या क्रिकेट स्पर्धेत भारताची बांगलावर मात

। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।

भारतीय पुरुष अंध क्रिकेट संघाने शुक्रवारी बांगलादेशचा 7 गडी राखून पराभव करत आंतरराष्ट्रीय अंध क्रीडा फेडरेशन विश्वचषक स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. उपांत्य फेरीच्या सामन्यात भारताने बांगलादेशला 20 षटकात 144/6 पर्यंत रोखले आणि नंतर 18 चेंडू बाकी असताना 145/3 च्या लक्ष्याचा पाठलाग केला.

गेल्या आठवड्यात जेव्हा दोन्ही संघांनी मोहिमेला सुरुवात केली. तेव्हा पाकिस्तानने भारताचा 18 धावांनी पराभव केला. उपांत्य फेरीत प्रथम फलंदाजीला उतरलेल्या बांगलादेशने पहिल्या नऊ षटकांत 62 धावा केल्यामुळे चांगली सुरुवात झाली. बांगलादेशकडून चांगली फलंदाजी करणारा आशिकुर रहमान 13व्या षटकात धावबाद झाला आणि संघाला 88/3 अशी अवस्था झाली. त्यानंतर एम आरिफ हुसेन आणि एस इस्लाम यांनी बांगलादेशचा डाव सावरला आणि 56 धावांची भागीदारी केली. भारताने बांगलादेशला 150 धावांचा टप्पा ओलांडू दिला नाही आणि शेवटच्या षटकात तीन विकेट घेत टायगर्सला 144/6 पर्यंत रोखले.

145 धावांचा पाठलाग करताना भारताला सुरुवातीचा धक्का बसला. कारण मेन इन ब्लू संघाने तिसऱ्याच षटकात फक्त 17 धावा असताना त्यांचा पहिला बळी गेला. यानंतर सुनील रमेश आणि नरेशभाई बाळूभाई तुमडा यांनी 68 धावांची भागीदारी करत भारताला लक्ष्यापर्यंत पोहोचवले. भारताला शेवटच्या 10 षटकांत आणखी 55 धावांची गरज होती. एनबी तुमडा आणि दुर्गा राव टोमपाकी यांनी बांगलादेशच्या गोलंदाजांचा धुव्वा उडवला आणि भारताने 17 षटकांत लक्ष्य गाठले.

Exit mobile version