| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
भारतीय संघाने तीन देशांच्या आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेत किर्गिस्तानचा 2-0 असा पराभव करून विजेतेपद पटकावले. यामध्ये झिंगन आणि कर्णधार सुनील छेत्री यांचे योगदान महत्वाचे ठरले.
संदेश झिंगन आणि कर्णधार सुनील छेत्री यांच्या गोलमुळे भारताने पराभव केला. त्याचबरोबर तीन देशांची आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धा जिंकली. पहिल्या सामन्यात भारताने म्यानमारवर 1-0 असा विजय मिळवला होता. किर्गिझस्तान प्रजासत्ताकने शनिवारी स्पर्धेतील त्यांच्या दुसर्या सामन्यात म्यानमारविरुद्ध 1-1 अशी बरोबरी साधली होती. त्यामुळे त्यांना स्पर्धा जिंकण्यासाठी फक्त ड्रॉची गरज होती. जवळपास 30,000 क्षमतेच्या खचाखच भरलेल्या स्टेडियममध्ये सामन्याच्या सुरुवातीपासूनच, प्रेक्षकांनी भारतीय खेळाडूंना प्रोत्साहन दिले. झिंगानने सामन्याच्या 34 व्या मिनिटाला पहिला गोल करत भारताला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर स्टार खेळाडू आणि कर्णधार छेत्रीने 84व्या मिनिटाला गोल करत आघाडी दुप्पट केली.
मिडफिल्डर ब्रँडन फर्नांडिसने प्रतिस्पर्ध्याच्या गोलसमोर फ्री-किक मारली आणि झिंगनने वेगवान चाल करून चेंडू गोलपोस्टच्या पुढे जाऊन भारताला पुढे नेले. किर्गिझ प्रजासत्ताकचा गोलरक्षक तोकोताएव एरझानला वाटले की. उंच भारतीय बचावपटू झिंगान हेडरसाठी जाईल. पण तो चुकीचा सिद्ध झाला. झिंगानने चेंडू खाली येण्याची वाट पाहिली आणि नंतर चतुराईने तो गोलपोस्टमध्ये टाकला. यानंतर भारताने जेव्हा-जेव्हा संधी मिळेल तेव्हा आपला आक्रमक पवित्रा कायम ठेवला. त्याचा फायदा 84व्या मिनिटाला संघाला झाला. पेनल्टी बॉक्समध्ये डेव्हिडोव्ह निकोलाईने नौरेम महेश सिंगला फाऊल केल्याने, भारताला पेनल्टी देण्यात आली. छेत्रीने या पेनल्टीचे रूपांतर गोलमध्ये केले. त्याचा आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील हा 85वा गोल होता.