‌‘ऑलिंपिकच्या यजमानपदासाठी भारत दावेदार’

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

भारतीय खेळाडूंनी यंदाच्या आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये 28 सुवर्णपदकांसह एकूण 107 पदकांवर मोहोर उमटवत ऐतिहासिक कामगिरी केली. या देदीप्यमान यशानंतर भारतीय ऑलिंपिक संघटनेच्या (आयओए) अध्यक्षा पी.टी. उषा यांनी आपले मत व्यक्त करताना म्हटले की, केंद्र सरकारकडून 2036 मधील ऑलिंपिकच्या यजमानपदाची तयारी करण्यात येत आहे. मला असे वाटत आहे की, भारत आता यजमानपदासाठी दावेदार म्हणून तयार झाला आहे.

पी.टी. उषा म्हणाल्या, “आपल्या देशाच्या पंतप्रधानांना खेळांमध्ये रस आहे. केंद्र सरकार खेळ व खेळाडूंच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्न करीत आहे. खेळाडू, प्रशिक्षक, सपोर्ट स्टाफ यांच्या अपार मेहनतीमुळे भारताला आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये पदकांची शंभरी ओलांडता आली. 2024 मधील पॅरिस ऑलिंपिकमध्ये भारत जास्त पदके जिंकेल, असा विश्वास आहे. जास्त पदकांवर नाव कोरल्यास भारत आपोआपच यजमानपदाचा दावेदार होऊ शकतो. भारताने 2036 मधील ऑलिंपिकच्या यजमानपदाच्या दावेदारीसाठी पावले उचलायला हवीत.” ऑलिंपिकच्या यजमानपदाची निवड करण्यासाठी पारंपरिक बोली पद्धत अवलंबली जात होती, पण आता ही पद्धत मागे टाकण्यात आली आहे. नव्या पद्धतीनुसार जो देश यजमानपदासाठी उत्सुक आहे,त्या देशाने प्रस्ताव ठेवल्यानंतर आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीच्या आयोगाद्वारे हा प्रस्ताव कार्यकारी मंडळाकडे सोपवण्यात येईल. त्यानंतर आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीच्या सत्रामध्ये मतदानाद्वारे यजमानपदाच्या जागेवर शिक्कामोर्तब करण्यात येईल.

Exit mobile version