मैदाने झाली हाऊसफुल!
। डब्लिंग । वृत्तसंस्था ।
भारतीय क्रिकेट संघ हा जागतिक क्रिकेट चालवत आहे असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. भारतीय संघ जगाच्या पाठीवर कुठंही खेळायला गेला तरी चाहत्यांचा ओघ हा कायम असतो. त्यामुळेच जगभरातील अनेक देशांना भारताने आपल्या देशात मालिका खेळावी असे वाटते. आयर्लंडच्या दौर्यावर दाखल झालेल्या भारतीय क्रिकेट संघाचा खेळ पाहण्यासाठी सर्व सामन्यांची तिकीटांची आगाऊ विक्री झाली आहे.सर्व मैदानावर हाऊसफुल्लचा बोर्डही झळकू लागल्याने आयर्लंड क्रिकेटवर लक्ष्मी प्रसन्न झाल्याचे बोलले जाते. भारताचा युवा संघ सध्या आयर्लंड दौर्यावर टी 20 मालिका खेळत आहे. पहिला टी 20 सामना हा 18 ऑगस्टला डब्लिंग येथे होणार आहे. जरी भारताचा युवा संघ खेळत असला तरी या सामन्याची सर्व तिकीटे विकली गेली आहेत. क्रिकेट आयर्लंडने आपल्या वेबसाईटवर एक पोस्ट केली आहे.
त्यात आयर्लंड क्रिकेट म्हणते की, आयर्लंड आणि भारत यांच्यात होणार्या पहिल्या आणि दुसर्या पुरूष टी 20 आंतरराष्ट्रीय सामन्याची सर्व तिकीटे विकली गेली आहे. तिसर्या टी 20 सामन्याची देखील सर्व तिकीट लवकरच विकली जातील.फ आयर्लंडसोबतचे सर्व सामने हे द व्हिलेज मलाहिदे क्रिकेट क्लब ग्राऊंडवर होणार आहेत. या स्टेडियमची प्रेक्षक क्षमता ही 11,500 इतकी आहे.
भारतीय संघाने आयर्लंड विरूद्धचे मागचे सर्व पाच टी 20 सामने जिंकले आहेत. महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखालील संघाने 2009 मध्ये इंग्लंडमध्ये झालेल्या वर्ल्ड टी 20 ग्रुप स्टेजमधील सामन्यात 8 गड्यांनी पराभव केला होता.
त्यानंतर भारत आणि आयर्लंड यांच्यात 2018 आणि 2022 मध्ये दोन टी 20 सामन्यांची मालिका झाली होती. त्यात भारताचीच सरशी झाली होती. भारतीय संघ आयर्लंडमध्ये तीन टी 20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वाखाली खेळणार्या या संघातील अनेक खेळाडू आपले आशिया कप आणि वर्ल्डकपमधील संघात स्थान पक्के करण्यासाठी जोर लावणार आहेत. विशेष म्हणजे जसप्रीत बुमराह हा टी 20 क्रिकेटमध्ये भारताचे नेतृत्व करणारा पहिला गोलंदाज ठरणार आहे. जसप्रीत बुमराहने यापूर्वी कसोटी क्रिकेटमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व केले आहे.