रिषभ पंतला गंभीर दुखापत; दिवसाअखेर 4 गडी गमावत 248 धावा
| मँचेस्टर | वृत्तसंस्था |
भारत आणि इंग्लंड यांच्यात मँचेस्टर येथे पार पडत असलेल्या चौथा कसोटी सामना सुरु आहे. पहिल्या दिवशी भारताने सामन्यावर पकड मिळवल्याचे दिसून आले आहे. भारताने पहिल्या दिवसाखेर 4 गडी गमवून 248 धावा केल्या. मात्र, ऋषभ पंतच्या दुखापतीमुळे भारतीय संघाची चिंता अधिक वाढली आहे.
तेंडुलकर अँडरसन कसोटी मालिकेतील चौथ्या सामन्यात इंग्लंडने भारताला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले. यावेळी भारताने पहिल्या दिवशी सावध खेळी केली. त्यामुळे पहिल्या दिवसावर भारताची मजबूत पकड दिसून आली. भारताकडून यशस्वी जयस्वाल आणि केएल राहुल यांनी चांगली सुरुवात करून दिली. पहिल्या बळीसाठी या दोघांना मिळून 94 धावांची खेळी केली. परंतु, केएल राहुल 46 धावांवर बाद झाला. त्यानंतर यशस्वी जयस्वाल आणि साई सुदर्शन या जोडीने 46 धावांची भागीदारी केली. यशस्वी जयस्वालने 58 धावा केल्या. तर, साई सुदर्शनने चमकदार कामगिरी केली. त्याने 61 धावा केल्या. कर्णधार शुबमन गिलची पहिल्या डावात बॅट काही चालली नाही. अवघ्या 12 धावांवर असताना पायचीत झाला. त्यामुळे संघावरील दडपण वाढले. मात्र, उपकर्णधार ऋषभ पंतने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. त्याने साई सुदर्शनसोबत भागीदारी केली. त्याने 48 चेंडूत 37 धावांची खेळी केली. परंतु, भारतीय डावाच्या 68 व्या षटकात ख्रिस वोक्सच्या एका वेगवान यॉर्कर चेंडूने पंतला दुखापतग्रस्त केले. हा चेंडू थेट त्याच्या बुटावर लागला. त्याच्या पायातून रक्तस्त्राव होत होता. दुखापतीची तीव्रता आणि वेदना पाहता त्याला ग्राउंड एम्ब्युलन्समध्ये मैदानाबाहेर नेण्यात आले. तो 37 धावांवर असताना रिटायर्ड हर्ट झाला. भारताचा पहिल्या दिवशीचा खेळ संपला तेव्हा 4 गडी गमवून 264 धावा केल्या आहेत. खराब प्रकाशमानामुळे पहिल्या दिवशीचा खेळ 83 षटकांचा झाला.
पंतला विश्रांतीचा सल्ला
कसोटीच्या पहिल्या दिवशी दुखापत झाल्यामुळे रिटायर्ड हर्ट झालेल्या भारताचा यष्टीरक्षक रिषभ पंतला मोठा धक्का बसला आहे. पंतच्या पायाला फ्रॅक्चर झाल्यामुळे त्याला सहा आठवड्यांचा विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे आणि त्यामुळे त्याला चौथ्या कसोटीत खेळता येणार नाही. तरीही त्याला इंजेक्शन देऊन फलंदाजीसाठी तयार करता येईल का, अशी विचारणा बीसीसीआयने वैद्यकीय टीमकडे केली आहे. अन्यथा भारताला 10 फलंदाजांसह मँचेस्टर कसोटीत इंग्लंडचा सामना करावा लागणार आहे. दरम्यान, निवड समितीने इशान किशनला पाचव्या कसोटीसाठी स्टँडबायवर राहण्यास सांगितले आहे. पंत 31 जुलै ते 4 ऑगस्ट दरम्यान ओव्हल येथे खेळल्या जाणाऱ्या शेवटच्या कसोटी सामन्याचा भाग असणार नाही.






