| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
पुढील वर्षी फेब्रुवारीत होणाऱ्या डेव्हिस चषक लढतीसाठी भारतीय टेनिस संघाला पाकिस्तानात जावेच लागणार आहे. अखिल भारतीय टेनिस संघटनेने सुरक्षेच्या कारणास्तव ही लढत पाकिस्तानऐवजी त्रयस्थ ठिकाणी खेळवण्याची विनंती आंतरराष्ट्रीय टेनिस महासंघाकडे (आयटीएफ) केली होती. मात्र, ‘आयटीएफ’ च्या न्यायाधिकरणाने ही विनंती फेटाळून लावल्याने आता जागतिक गट-1 मधील लढतीसाठी भारतीय टेनिस संघाला तब्बल 60 वर्षांनंतर शेजारील देशात जावे लागणार आहे.
भारताच्या डेव्हिस चषक संघाने 1964 मध्ये अखेरचा पाकिस्तान दौरा केला होता. “आम्ही डेव्हिस चषक लढत त्रयस्थ ठिकाणी खेळण्याचा प्रस्ताव ठेवला होता. मात्र, आयटीएफ’च्या न्यायाधिकरणाने आमची विनंती फेटाळून लावली आहे. आम्ही सोमवारी क्रीडामंत्र्याची भेट घेऊन संघ पाकिस्तानात पाठवायचा की नाही, याबाबत चर्चा करू,” असे ‘एआयटीए’चे महासचिव अनिल धुपर म्हणाले. भारताने 3-4 फेब्रुवारीला इस्लामाबाद येथे होणारी लढत खेळण्यास नकार दिल्यास पाकिस्तानला विजेते म्हणून घोषित केले जाईल आणि भारताची जागतिक गट-2 मध्ये पदावनती होईल.