ऑस्करमध्ये भारत

ऑस्कर हे चित्रपटांसाठीचे सर्वोच्च पुरस्कार मानले जातात. आजवर त्यांमध्ये मुख्यतः हॉलिवूडच्या चित्रपटांनी आणि कलाकारांनी दादागिरी गाजवली आहे. सत्यजित रे यांच्यासारख्यांना इतर अनेक पुरस्कार मिळाले तरी त्यांच्या सिनेमांचा ऑस्कर सन्मान झाला नव्हता. अखेर 1992 मध्ये त्यांना जीवनगौरव पद्धतीचा पुरस्कार दिला गेला. ब्रिटीश दिग्दर्शक रिचर्ड अटेनबरा यांच्या गांधी सिनेमाशी संबंधित भानू अथय्या यांना वेषभूषेसाठीचे ऑस्कर मिळाले होते. यंदा मात्र भारतीय कलावंतांच्या दोन भारतीय कलाकृतींना हा गौरव लाभला आहे. आरआरआर या प्रचंड यशस्वी सिनेमातील नाटू नाटू या गाण्याला याआधीही अमेरिकेतील संगीत पुरस्कार मिळाला होता. आता त्याने ऑस्करही जिंकले आहे. खरे तर नाटू हे काही अद्वितीय गाणे नाही. हिंदी वा तेलुगू-तमीळ सिनेमात अशी गाजलेली शेकडो दिसतील. नृत्य किंवा संगीत या दोन्ही कसोट्यांवर ते ऑस्करविजेते भारतीय गाणे ठरावे असे नाही. तरीही ऑस्कर समितीला तसे ते वाटले. त्यामुळे राजामौली, संगीतकार एम. एम. किरवाणी आणि चंद्राबोस यांचे अभिनंदन. माहितीपटांच्या श्रेणीत द एलिफंट व्हिस्परर्सला मिळालेले पारितोषिक मात्र खरेच रास्त आहे. कार्तिकी गोन्साल्विस या दिग्दर्शिकेने हा माहितीपट तयार केला. तमिळनाडूच्या मदुमलाई जंगलातील एका आदिवासी जोडप्याने हत्तीच्या पिलाचा केलेला सांभाळ हा त्याचा विषय आहे. या हत्तीच्या पिलाची आई विजेच्या तारेचा झटका लागून मरण पावली. त्यानंतर त्या पिलावर जंगली कुत्र्यांनी हल्ला केला. अशा स्थितीत वन खात्याच्या कर्मचार्‍यांना ते सापडले. ते त्यांनी बोम्मन आणि बेली या जोडप्याकडे सोपवले. या दोघांनी त्याचे नाव रघू ठेवले आणि मुलाप्रमाणे त्याची काळजी घेतली. हत्ती हा खरे तर जंगली प्राणी आहे. त्याला मैलोगणती चालायला आणि भरपूर खायला लागते. त्याची देखभाल करणे हे सोपे नव्हते. पण बोम्मन आणि बेली हे त्याच्याशी एखाद्या माणसाच्या मुलाप्रमाणे बोलू लागले. कार्तिकीच्या माहितीपटाचे वैशिष्ट्य असे आहे की, ती सतत दोन वर्षे या प्रवासाचे चित्रण करीत होती. म्हणजेच यातली कहाणी जशी घडली तसे तिचे चित्रीकरण झाले व तसेच ते आपल्यासमोर येते. ते बहुतांशी नैसर्गिक प्रकाशातच झाल्याने त्याची खुमारी वाढली आहे. कार्तिकीने यापूर्वी आशियाई अस्वले तसेच उत्तराखंडमधील ओक वृक्षांचे रक्षण इत्यादींवर माहितीपट केले आहेत. वन्यजीवसंरक्षणाबाबतची तळमळ तिच्या या कामातून दिसते. त्या अर्थाने ती धंदेवाईक दिग्दर्शिका नाही. त्यामुळे तिचा गौरव महत्वाचा आहे.   गुणीत मोंगा ही या माहितीपटाची निर्माती असून दसविदानिया, अ गर्ल इन यलो बूट्स, मसान यांसारख्या अनेक प्रायोगिक पण उत्तम सिनेमांना तिच्या कंपनीने मदत केली आहे. ती काय किंवा कार्तिकी काय या तिशी-चाळिशीतील महिला आपल्या आवडत्या विषयांमध्ये अत्यंत मनस्वीपणे व शिस्तशीरपणे जे काम करत आहेत ते खरोखर कौतुकास्पद आहे. 

Exit mobile version