आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने रचला इतिहास!

प्रथमच जिंकली 70 हून अधिक पदके

| चीन | वृत्तसंस्था |

2023च्या आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये भारताने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. भारताने आपली उत्कृष्ट अशी लय कायम ठेवत अकराव्या दिवशी सकाळी दोन पदके जिंकली. पहिले पदक 35 किलोमीटर शर्यतीत आणि दुसरे पदक तिरंदाजीमध्ये होते. पहिल्या दहा दिवसांत 69 पदके जिंकणाऱ्या भारताने एकाहत्तरचा जादुई आकडा गाठला आणि सर्व जुने विक्रम मोडीत काढले. आशियाई क्रीडा स्पर्धेच्या इतिहासातील ही भारताची सर्वोत्तम कामगिरी आहे. यापूर्वी कधीही आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने 71 पदके जिंकली नव्हती. ज्योती सुरेखा आणि ओजस देवतळे या जोडीने मिश्र तिरंदाजी स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून भारताला 71वे पदक मिळवून दिले.

आशियाई क्रीडा स्पर्धा या खेळांना 1951 मध्ये सुरू झाली. पहिल्या आशियाई क्रीडा स्पर्धा या दिल्ली येथे झाल्या होत्या आणि यजमान भारताने एकूण 51 पदके जिंकली. यामध्ये 15 सुवर्ण, 16 रौप्य आणि 20 कांस्य पदकांचा समावेश आहे. पदकतालिकेत भारत दुसऱ्या स्थानावर होता. मात्र, यानंतर भारताला 50 पदके मिळविण्यासाठी 31 वर्षे वाट पाहावी लागली. 1982 मध्ये नवी दिल्ली येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने 13 सुवर्णांसह 57 पदके जिंकली होती. 1954 मध्ये भारताने एकूण 17 पदके जिंकली आणि 1958 मध्ये केवळ 13 पदके जिंकली होती, तर 1951 मध्ये भारताने 15 सुवर्ण जिंकले.

असा एक प्रसंग 1990 मध्ये आला होता, जेव्हा भारत पदकतालिकेत पहिल्या 10 मध्येही नव्हता. या वर्षीही भारताकडे केवळ 23 पदके होती. त्यात एकच सुवर्णपदक होते. 1998 पासून भारताच्या कामगिरीत सुधारणा झाली आणि 2006 मध्ये प्रथमच भारताने घरापासून दूर 50 हून अधिक पदके जिंकली. तेव्हापासून भारत सतत 50 हून अधिक पदके जिंकत आहे. 2010 मध्ये, भारताने 65 पदके जिंकली आणि सर्वाधिक पदकांचा नवा विक्रम केला. 2018 मध्ये, भारताने यात आणखी सुधारणा केली आणि 70 पदके जिंकली. आता 2023 मध्ये, भारताने 71 हून अधिक पदके जिंकली आहेत आणि इतर अनेक स्पर्धांमध्ये खेळाडूंनी अंतिम फेरी गाठून पदके मिळवली आहेत. अशा परिस्थितीत भारतीय खेळाडू नवी यशोगाथा लिहिणार हे निश्चित आहे. यावेळी शंभरी पार करण्याचा नारा देत भारतीय खेळाडू हांगझाऊकडे रवाना झाले होते. अशा स्थितीत यंदा भारताच्या झोळीत 100 पदके येतील अशी अपेक्षा आहे.

तिरंदाजीत ज्योती अन्‌‍ ओजसची कमाल
आशियाई खेळांमध्ये दिवसाच्या सुरुवातीला भारताने सुवर्णपदकाची कमाई केली. तिरंदाजीच्या कंपाऊंड मिक्स्ड टीम इव्हेंटमध्ये भारताच्या ज्योती सुरेखा वेन्नम आणि ओजस प्रवीण देवताळे या जोडीने दक्षिण कोरियाच्या सो चेचान आणि जू जेहून या जोडीचा अंतिम फेरीत 159-158 अशा फरकानं पराभव केला.


यामुळे आशियाई खेळांमध्ये भारताच्या नावावर हे सोळावे सुवर्णपदक नोंदवले गेले आहे. तसेच भारताने आशियाई खेळांमध्ये आजवर जिंकलेल्या सुवर्णपदकांशी बरोबरी केली आहे. यापूर्वी जकार्तामध्ये झालेल्या आशियाई खेळात भारताने ही कामगिरी केली होती.

सुवर्ण पदक जिंकत अन्नू राणीने घडवला इतिहास
भारताची भालाफेकपटू अन्नू राणीने सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे. हे तिचे दुसरे आशियाई पदक आहे आणि पहिले सुवर्ण पदक आहे. अन्नूने आपल्या चौथ्या प्रयत्नात 62. 92 मीटर भाला फेकला. तिच्या या फेकीने श्रीलंकेची भालाफेकपटू दुसऱ्या क्रमांकावर आली.


श्रीलंकेच्या दिलहानी लेकेमगेने रौप्य पदक जिंकले. तिने 61.57 मीटर भाला फेकला. तर कांस्य पदक चीनच्या ल्यू हुईहुई या खेळाडूने जिंकले. ही अन्नूची दुसरी आशियाई क्रीडा स्पर्धा आहे. 32 वर्षीय अन्नूने 2014 साली इंचियॉन येथे पार पडलेल्या स्पर्धेत 59.53 मीटर भाला फेकून कांस्य पदक जिंकले होते. 2018 साली पार पडलेल्या आशियाई स्पर्धेत तिला पदक जिंकण्यात अपयश आले होते. तिला सहाव्या स्थानावर समाधान मानावे लागले होते. या स्पर्धेत नीरज चोप्राने सुवर्णपदक जिंकून भारताची मान उंचावली होती.

पारुल चौधरीने प्रथमच जिंकले सुवर्ण
स्टीपलचेस शर्यतीत रौप्यपदक जिंकल्यानंतर भारताच्या पारुल चौधरीने मंगळवारी पाच हजार मीटर शर्यतीत सुवर्णपदक जिंकून इतिहास घडवला. महिलांच्या या शर्यतीतील भारताचे हे पहिलेच सुवर्णपदक होय. उत्तर प्रदेशातील मेरठ जिल्ह्यातील असलेल्या 29 वर्षीय पारुलने जबरदस्त वेग कायम ठेवत प्रतिस्पर्ध्यांवर दबाव कायम ठेवला होता.


शेवटच्या 30 मीटरमध्ये मुसंडी मारून तिने जपानच्या रिरिका हिरोनाकाला मागे टाकले आणि 15 मिनिटे 14.75 सेकंदात सुवर्णपदक निश्चित केले. आशियाई क्रीडा स्पर्धेत 1998 मध्ये सर्वप्रथम पाच हजार मीटरची शर्यत आयोजित करण्यात आली होती. तेव्हा पासून सुनीता राणी, प्रीजा श्रीधरन यांनी रौप्यपदके जिंकली; मात्र कुणालाही सुवर्णपदकाचा आनंद घेता आला नव्हता. हा आनंद आज पारुलने मिळवला. भारताची दुसरी स्पर्धक अंकिताला पाचव्या स्थानावर समाधान मानावे लागले

स्क्वॉशमध्ये कांस्य पदक
भारतानेआशियाई क्रीडा स्पर्धा 2023 मध्ये स्क्वॉश मिश्र दुहेरीमध्ये भारतीय जोडीने कांस्य पदक जिंकले. यानंतर भारताची पदक संख्या 72 वर पोहचली आहे. भारताने 2018 मधील जकार्ता येथे झालेल्याआशियाई क्रीडा स्पर्धेत आतापर्यंतच्या इतिहासात सर्वाधिक मेडल्स जिंकण्याचा विक्रम केला होता. आता हे रेकॉर्ड भारताने हागंझू येथीलआशियाई क्रीडा स्पर्धेत मोडले आहे.


भारताने जकार्ता येथे 70 पदके जिंकली होती. भारताची स्क्वॉश जोडी अनहत सिंह आणि अभय सिंह यांनी उपांत्य फेरीत प्रवेश करत आपले कांस्य पदक निश्चित केले होते. त्या पदकाचा रंग बदलण्यासाठी, रौप्य पदकासाठी त्यांना आज मलेशियाच्या बिनती आणि सयफिकचा पराभव करणे गरजेचे होते. भारतीय जोडीने आपला पहिला गेम 11-8 असा जिंकत आघाडी देखील घेतली होती. मात्र मलेशियाच्या जोडीने दुसऱ्या डावामध्ये जोरदार पुनरागमन केले. त्यांनी दुसरा डाव 11-2 अशा मोठ्या फरकाने जिंकला. त्यानंतर तिसऱ्या डावामध्ये भारतीय जोडीने थोडी झुंज दिली. मात्र मलेशियाने तिसरा डाव देखील 11-9 असा जिंकत आपले रौप्य पदक निश्चित केले. भारतीय जोडीलाउपांत्य फेरीत विजय मिळवता आला नाही. मात्र त्यांनी कांस्य पदकासह भारताची पदक संख्या 72 वर नेली. याचबरोबर भारताची महिला बॉक्सर परवीनने देखील 57 किलो वजनी गटात कांस्य पदक जिंकले.

Exit mobile version