विजयाच्या दिशेने ‘इंडिया’ची घौडदौड

आमदार जयंत पाटील यांना विश्वास
ग्रामपंचायत ते लोकसभा निवडणुकीसाठी सज्ज

| रायगड | प्रतिनिधी |
भारतीय जनता पार्टी विरोधात देशात सर्व पक्षीयांनी रान उठविले आहे. राजकीय पक्षांनी भाजप हटावचा नारा देत ‘इंडिया’ संघटित केला आहे. भाजपविरोधी 63 टक्के मतदान इंडियाच्या बाजूने आहे. यामुळेच आगामी होणाऱ्या लोकसभा ते ग्रामपंचायत निवडणुका इंडियामध्ये समाविष्ट घटक एकत्रिपणे निवडणूक लढून विजयी मोहर उमटविणार आहेत. स्थानिक पातळीवरील लोकप्रतिनिधी ते वरिष्ठ नेतेमंडळी यांच्या मधील सकारात्मक समन्वयामुळे इंडिया स्थानिक स्वराज्य संस्था ते लोकसभा निवडणुकीत विजयाच्या दिशेने घौडदौड करील असा विश्वास शेतकरी कामगार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांनी व्यक्त केला.

रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या तीन जागांच्या निवडणुकीसाठी शनिवारी मतदान घेण्यात आले. यामध्ये आमदार जयंत पाटील हे स्वतः उमेदवार आहेत. त्याचबरोबर मतदार म्हणून मतदानाचा हक्क आमदार जयंत पाटील यांनी अलिबाग नगरपरिषदेच्या शाळेत असणाऱ्या मतदान केंद्रात बजावला. मतदान करून आल्यानंतर प्रसार माध्यमांबरोबर आमदार जयंत पाटील बोलत होते.

देशात आणि राज्यात निवडणुकांचे वारे वाहण्यास सुरुवात झाली आहे. सत्तेसाठी बंड करून पक्ष सोडून जाणाऱ्या नेत्यांना जनता आता स्वीकारणार नाही. देशभरातील अल्पसंख्यांक मतदार इंडिया सोबत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. इंडिया मध्ये सामील झालेले घटक पक्ष आणि त्यांची रणनीती भाजपला निश्चितपणे पराभूत करेल. या सर्व घटक पक्षांच्या मतांची टक्केवारी 63 टक्क्यांपर्यंत जाणारी आहे. यामुळे हे मतदान ‘इंडिया’च्या उमेदवारांना मिळेल या दिशेने कार्यप्रणाली राबविण्यात येत आहे. असे आमदार जयंत पाटील यांनी सांगितले.

लोकसभा आणि विधानसभा निवडणूक उंबरठ्यावर येऊन ठेपली आहे. त्याचबरोबर जिल्हा परिषद, महानगर पालिका, नगर पालिका, नगर पंचायती, पंचायत समिती आणि ग्रामपंचायतींमध्ये प्रशासक राज सुरु आहे. या निवडणुका देखील लवकरच अपेक्षित आहेत. या सर्व निवडणुका इंडिया च्या माध्यमातूनच लढविल्या जाणार आहेत. इंडिया आघाडीमध्ये असणाऱ्या घटक पक्षांच्या नेतृत्वांबरोबर याबाबतची चर्चा झाली आहे. यामुळेच रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक देखील इंडिया आघाडीच्या माध्यमातूनच लढविण्यात आली असल्याचे आमदार जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.

Exit mobile version