पावसाची ‘कसोटी’

दोन दिवस पावसामुळे वाया
अनिर्णीत निकालाकडे वाटचाल?
नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
इंग्लंडमधील बेभरवशाच्या वातावरणाचा पहिल्यावहिल्या जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या अंतिम लढतीला फटका बसला आहे. सोमवारी चौथा दिवस पूर्णत: पावसामुळे वाया गेल्याने भारत-न्यूझीलंड कसोटी सामना अनिर्णित निकालाकडे वाटचाल करीत आहे.

सामन्याचा पहिला दिवस पावसाचाच खेळ झाल्यानंतर दुसरा संपूर्ण दिवस खेळ होऊ शकला नाही. हॅम्पशायर बाऊल येथे सातत्याने पावसाचा वर्षांव सुरूच आहे. सकाळी 10.30 वाजता (भारतीय वेळेनुसार दुपारी 3 वाजता) चौथ्या दिवसाचा खेळ सुरू होणे अपेक्षित होते; परंतु मुसळधार पावसामुळे अखेरीस साडेचार तास प्रतीक्षा के ल्यानंतर पंचांनी खेळ रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे जागतिक कसोटीची रंगत पाहायला स्टेडियमपर्यंत आलेल्या क्रिकेटरसिकांची निराशा झाली.

‘विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाच्या वर्षांवामुळे जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या अंतिम सामन्याचा चौथ्या दिवसाचा खेळ होऊ शकला नाही,’ असे आयसीसीने म्हटले आहे. सामन्याचा भारताचा पहिला डाव 217 धावांवर गुंडाळल्यानंतर न्यूझीलंडने पहिल्या डावात 2 बाद 101 धावांपर्यंत मजल मारली होती. अंतिम सामन्याचे यजमानपद साऊदम्पटनला देण्याच्या ‘आयसीसी’च्या निर्णयावर भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागने टीका केली आहे.

196 षटकांचा खेळ बाकी
उर्वरित दोन दिवसांत प्रत्येकी 98 षटकांप्रमाणे कमाल 196 षटकांचा खेळ बाकी आहे. या षटकांत कसोटी निकाली न ठरल्यास भारत आणि न्यूझीलंड यांना संयुक्त विजेतेपद देण्यात येईल.

पहिला दिवस : पावसामुळे वाया
दुसरा दिवस : 64.4 षटके
तिसरा दिवस : 76.3 षटके
चौथा दिवस : पावसामुळे वाया

तिकीट दरांत कपात
पाऊस आणि अंधूक प्रकाश यांचा फटका बसलेल्या जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या अंतिम लढतीच्या राखीव दिवसाचे तिकीट दर कमी करण्यात आले आहेत. सामन्याच्या पहिल्या दिवशी पूर्णत: पावसाचाच खेळ पाहायला मिळाला. त्यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) हा निर्णय घेतला आहे.

Exit mobile version