‘इंडिया’ नव्हे ‘इंडी’ आघाडी

Bharatiya Janata Party (BJP) leader Devendra Fadnavis looks on during a press conference on 26 November 2019 in Mumbai, India. Fadnavis announced his resignation as Maharashtra chief minister. (Photo by Himanshu Bhatt/NurPhoto via Getty Images)

फडणवीसांचा खोचक टोला

| मुंबई | प्रतिनिधी |

एकीकडे इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी देशातील विविध विरोधी पक्षांचे प्रमुख नेते मुंबईतील बैठकीसाठी दाखल झाले होते. दुसरीकडे भाजपा, शिंदे गट आणि अजित पवार गट यांच्या महायुतीच्या बैठकीलाही तिन्ही पक्षांमधल्या प्रमुख नेत्यांनी उपस्थिती लावली होती. यावेळी दोन्हीकडून एकमेकांवर जोरदार टीका करण्यात आली. वरळी येथील महायुतीच्या बैठकीत भाषणावेळी देवेंद्र फडणवीसांनी ‌‘इंडिया’चा उल्लेख पहिल्यांदाच ‌‘इंडी’ असा करत विरोधकांना खोचक टोला लगावला. महायुतीची अवस्था ईडी आघाडी सारखी नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगत टीका केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मी, अजित पवार आमच्यात पूर्ण संवाद आहे. एका विचाराने आम्ही चाललो आहोत. सगळे निर्णय एकत्र घेत आहोत. आमच्यात 100 टक्के समन्वय आहे. आमची परिस्थिती इंडी आघाडीसारखी नाही, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

ममता बॅनर्जींचा ‌‘तो’ प्रसंग !
दरम्यान, इंडिया आघाडीवर टीका करण्यासाठी यावेळी देवेंद्र फडणवीसांनी ग्रँड हयात हॉटेलमधील बैठकीदरम्यान घडलेला प्रसंग सांगितला. महायुतीच्या व्यासपीठावर आलेल्या कुणालाही प्रश्न पडला नाही की माझी जागा कुठे आहे? समोरच्या दिग्गजांना कुणालाही प्रश्न पडला नाही की आम्ही खाली का आहोत? पण, इंडी आघाडीच्या बैठकीत ममता बॅनर्जी आल्या, तेव्हा सगळे खुर्च्यांवर बसले होते. त्या नमस्कार करत एकेका समोरून जात होत्या. कुणीच खुर्ची दिली नाही. शेवटी परत आल्या आणि नमस्कार करून निघून गेल्या, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

शरद पवारांवरही केली टीका
शरद पवारांनी तेव्हा ममता बॅनर्जींना थांबवण्याचा प्रयत्न केला. तसा प्रयत्न शरद पवारांनी अजित पवारांनाही थांबवण्याचा प्रयत्न केला होता. परंतु ते थांबले का? आता सगळ्यांना नेमकी दिशा समजली आहे, की कुठल्या दिशेने जायचे आहे. त्यामुळे ममतादीदी तिथून निघून गेल्या, अशी बोचरी टीका फडणवीस यांनी केली.

विरोधकांची भेंडी आघाडी
आमचे पंतप्रधानपदाचे उमेदवार मोदी आहेत. तुमचे पंतप्रधानपदाचे उमेदवार कोण आहेत? रोज नवीन नाव समोर येत आहेत. पण, ज्यांनी बैठकीचे आयोजन केले त्यांचे नाव येतच नाही. इंडिया आघाडीची भेंडी आघाडी झाली आहे. लोगो तयार करणार होते, पण लोगोसुद्धा आला नाही. रंग कोणता? 36 पक्ष कोणते? प्रत्येकाचे रंग वेगळे, असेही फडणवीस यावेळी म्हणाले. आजच इंडी आघाडीची भेंडी आघाडी झाली आहे. जे लोक पत्रकातही म्हणू शकत नाहीत की आम्ही 100 टक्के एकत्र लढणार आहोत ते एकत्र काय लढणार? वडेट्टीवार बिचारे चकरा मारत होते की कुठेतरी फुटेज मिळेल. त्यांना एक जबाबदारी दिली की मीडियात जाऊन सांगा की, लोगो रिलीज होणार नाही, असेही फडणवीस म्हणाले.

Exit mobile version