भारताची मदार पुन्हा एकदा फिरकीवरच!

भारत पुन्हा एकदा यजमानाच्या आवेशात आपल्या घरच्या विश्वचषक 2023 क्रिकेट मोहिमेला चेन्नईपासून सुरूवात करीत आहे. विश्ववचषक सर्वाधिक जिंकणाऱ्या आणि याचा चेन्नईत याआधीच्या 50 पदकांच्या क्रिकेट सामन्यात भारताला धूळ चारणाऱ्या ऑस्ट्रेलियाशी आपली सलामी होत आहे. खरं तर, ही गोष्ट यजमान म्हणून भारताला टाळताही आली असती. दोन दुबळ्या संघांविरूद्ध सलामीलाच खेळून आपल्या संघाची घडी बसवून प्रबळ प्रतिस्पर्धी संघांशी दोन हात करणे संयुक्तिक ठरले असते.

भारतीय संघाची घडी बसते न बसते तोच आघाडीचा प्रमुख युवा फलंदाज शुभमन गिल याला ‌‘डेंग्यू’ झाला. कोणत्याही मोठ्या स्पर्धेत जो संघ अधिक काळ तंदुरूस्त राहतो, तोच संघ अंतिम फेरीपर्यंत पोहोचतो, असा आजवरचा अनुभव आहे. भारताची घडी अद्याप बसली नाही. शुभमन गिलचे आजारपण काही दिवस तरी राहणार हे भारतीय कर्णधारानेच आज सूचित केले. तो म्हणााला, तो जायबंदी नाही, पण आजारी आहे. तो लवकर बरा होण्यासाठी आपण त्याला शुभेच्छा देऊया! अन्य खेळाडूंच्या बाबतीत सारं काही आलबेल आहे, असे म्हटलं जात आहे.

परंतु, चेन्नईच्या अतिउष्ण हवामानात आणि आर्द्रतेमध्ये कोणत्या खेळाडूला कधीही काही होऊ शकते. खरं तर, भारताकडे सध्या जगातील सर्वोत्तम फलंदाजीच्या फळीला आव्हान देऊ शकेल असे वेगवान गोलंदाजीचे त्रिकूट आहे. महमद शामी, बुमरा आणि सिराज या तिघांना एकत्रित खेळविण्याचे धाडस खरं तर भारताने आताच करायला हवे. कारण, विश्वचषक स्पर्धेचा इतिहास पडताळून पाहिला तर जेव्हा भारताकडे असे तीन किंवा त्यापेक्षा अधिक गोलंदाज होते, त्यावेळीच भारताने उत्तम कामगिरी केेल्याचे लक्षात येते.

मात्र, चेन्नईत सरावादरम्यान पत्रकारांशी बोलताना रोहित शर्मा वेगळाच सूर आळवताना दिसत होता. कुलदीप यादव सध्या फॉर्मात आहे. त्याच्या जोडीला अश्विनची निवड करून रवींद्र जाडेजाला तिसरा फिरकी गोलंदाज म्हणून संघात स्थान देण्याची भारताची योजना त्याच्या बोलण्यातून डोकावत होती. त्याच्या मनाला बळकटी मिळण्याचे कारण म्हणजे, तो हार्दिक पंड्याची एक नियमित वेगवान गोलंदाज म्हणून अधिक स्तुती करती होता. याचाच अर्थ असा की, वेगवान गोलंदाजीच्या त्रिकुटापैकी एकाची संधी रविवारी हिरावून घेतली जाण्याची शक्यता अधिक आहे.

विश्वचषक स्पर्धेसारख्या मोठ्या स्पर्धेची सुरूवात ही नेहमी विजयाने केली गेली पाहिजे. आणि जेव्हा तुम्ही संभाव्या विजेत्याला सलामीला प्रतिस्पर्धी म्हणून सामोरे जाता, त्यावेळी आयोजक म्हणून आपण चाणक्यनीतीत कुठे तरी कमी पडतो याची जाणीव होते. कारण भारतीय संघाचे क्रित्येक वर्षापासूनचे दुखणे आहे की, आपण चांगले ‌‘स्टार्टर’ नाही. त्यामुळे पूर्ण तयारीत असतानाच अशा प्रबळ प्रतिस्पर्ध्याशी भिडायाला थोडा अवधी घ्यायला हवा होता. उद्या नाणेफेक जिंकून चेन्नईच्या उष्ण हवामानात पूर्वार्धात जर ऑस्ट्रेलियन खेळाडूंना पळायला लावलं, तर आपल्याला त्याचा निश्चितच लाभ होईल. रोहित शर्माची तीन फिरकी गोलंदाज खेळविण्याची भाषा, एक गोष्ट मात्र स्पष्ट करीत आहे; ती म्हणजे, खेळपट्टी फिरकीलाच सहाय्यक असणार आहे.

Exit mobile version